नाशिक : आगामी महापालिका निवडणुका या वर्षात होणार की, पुढील वर्षात याबाबतचा संभ्रम कायम असताना, काँग्रेसने मात्र पक्षात निवडणूक फीवर वाढविण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसकडून शनिवार (दि.५) पासून काँग्रेस भवन येथे अर्ज स्वीकारले जाणार असल्याने, इच्छुकांमध्ये लगबग बघावयास मिळत आहे.
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मते, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या उमेदवारांचे परिचय पत्र प्रभागाची माहिती असणाऱ्या अर्जांसमवेत स्वीकारले जाणार आहेत.
पक्षाच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सरचिटणीस राजकुमार जेफ यांच्याकडे इच्छुकांना अर्ज जमा करावे लागणार असल्याची माहिती शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली. महापालिका निवडणूक पूर्वतयारीकरिता १० जुलैपासून शहरातील विविध प्रभागांत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच शहरातील विविध ब्लॉकमधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रभागनिहाय अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणी व बूथ यंत्रणा उभी करणे अशा विविध विषयांवर बैठका होणार असल्याचेही छाजेड यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इतर पक्षांमध्ये आयाराम, गयाराम सुरू असताना, काँग्रेसने मात्र थेट इच्छुकांची चाचपणी करण्याचा विचार सुरू केल्याने, पक्षात थोडी का होईना हालचाल सुरू होणार असल्याचे समाधान कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.
प्रदेशाध्यक्षांच्याच सूचना
नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय नेतृत्वाबरोबर प्रदेश काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशांनुसार प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी व बैठका घेण्यात येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे सर्व आघाडी विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार
राज्यातील फोडाफोडीचे राजकारण, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, शहरातील रस्त्यांची दुरवस्था, स्मार्ट सिटी नावाखाली चाललेला भ्रष्टाचार, प्रशासनातील भ्रष्टाचार व नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये येणारी अडचण, धाक दडपशाही हे सर्व विषय घेऊन काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे शहराध्यक्ष छाजेड यांनी सांगितले.

