

सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकारण रंगतदार होत असताना सध्या महापालिका निवडणुकांसाठी प्रमुख पक्षांची एकच धावपळ सुरू आहे. तुल्यबळ, लोकप्रिय आणि विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारांसाठी सर्व पक्षांनी आपापले रेड कार्पेट अंथरले आहेत. राजकीय निष्ठा, विचारसणी किंवा जुना पक्ष यापेक्षा अधिक महत्त्व आता उमेदवाराची विजयी क्षमता याला दिले जात आहे. त्यामुळे पक्षांची रणनीती पूर्णतः बदलली आहे.
जनतेची सेवा हा मुद्दा बाजूला पडला असून निवडणुकीत यश मिळविणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे लोकशाहीत विचार, तत्त्व आणि निष्ठा यांची जागा व्यवहार, मॅनेजमेंट आणि पॅकेज डिल्स यांनी घेतली आहे.
महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे; मात्र केवळ नारेबाजी, पोस्टरबाजी किंवा जनाधार पुरेसा न ठरता सध्या कौन बनेगा विनर यावरच लक्ष केंद्रित आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट, काँग्रेस आदी पक्ष तगड्या उमेदवारांसाठी सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी दोन पक्ष एकाच उमेदवारासाठी स्पर्धा करताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर काही कार्यकर्ते लोकप्रिय आहेत. समाजकार्य, संघटन कौशल्य, जातीय समीकरण, आर्थिक ताकद किंवा विशिष्ट मुद्द्यांवरील जनसंपर्कामुळे काही नेते अपरिहार्य बनले आहेत. या नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी ऑफरचा धमाका लावला जात आहे. त्यातून उमेदवार हॉट प्रॉपर्टी बनल्याचे चित्र आहे. विचासरणी किंवा पक्षनिष्ठेपेक्षा निवडणुकीत यश मिळवून देणारे चेहरे अधिक प्राधान्यक्रमात आहेत. यामुळे जुन्या निष्ठावंतांना कोंडीत पकडले जात आहे.
एकीकडे यशस्वी आणि जनाधार असलेले उमेदवार आवश्यक आहेत; पण दुसरीकडे आर्थिक ताकद असलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे, हेही उघड सत्य आहे. त्यामुळे आता पॉकेट फूल ऑफ डॉलर्स किंवा बॅग भरून मते देणार्या उमेदवारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांकडूनच पुढाकार घेतला जात आहे. त्यातूनच तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ते दुय्यम ठरत आहेत. त्यांनी कितीही सेवा केली असली, तरी त्यांच्याकडे विजयाची खात्री नसेल, तर कोण विचारत नसल्याचे वास्तव आहे.
2010 ते 2020 या दहा वर्षांत काँग्रेसची महापालिकेतील सर्व सूत्रे शारंगधर देशमुख यांच्या हातात होती. आता देशमुख हे शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम हे सुद्धा शिवसेना शिंदे गटात आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहरचे आमदार असल्याने शिवसेनेचे पारडे जड आहे. यंदा काँग्रेसची मदार आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यावर असेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अस्तित्व नसल्यासारखी स्थिती आहे. शिवसेना ठाकरे गटात संजय पवार यांच्यासह पदाधिकार्यांनी बंड केल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस त्यांना जास्त विचारात घेणार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुनर्वैभव येण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता महापालिका निवडणुकीत लक्ष घातले असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगत वाढली आहे.
2015-2020 या पंचवार्षिक सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली. त्यानंतर तब्बल पाच वर्षे निवडणुका झाल्या नाहीत. या दरम्यान राजकारणात बरेच फेरबदल झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी, शिवसेना आदी पक्षांचे कारभारी आता वेगवेगळ्या पक्षांत गेले आहेत. त्यामुळे मागील सभागृहात दोस्त असलेले आता दुश्मन झाले आहेत, तर दुश्मन असलेले दोस्त बनले आहेत. परिणामी, यंदाच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.