

मुंबई : महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका एकदिलाने लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त ‘पुढारी’च्या हाती आले आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. कोरोनामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नोहेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवरील राजकारण महत्वाचे ठरते. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका यामध्ये वेगवेगळया आघाड्यांची गणिते मोठ्या पक्षांना मारक ठरु शकते. या पार्श्वभूमिवर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या निवडणूका तिन्ही पक्षांनी मिळून एकत्रच लढण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
२३ जून रोजी नगरविकास मंत्रालयाने या निवडूकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता या निवडणूकीचा धुरळा उडणार हे स्पष्ट झाले आहे. आता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, उबाठा व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी या निवडणूकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये विधानसभा निवडणुकीचा कित्ता महापालिका निवडणुकीत गिरवायचा आहे. यासाठी. अंतर्गत कुरुबुरींकडे दूर्लक्ष करुन एकसंघपणे या निवडणूकांनमध्ये सामोरे जाणे व विधानसभेसारखा पूर्ण बहूमत मिळवणे यासाठी नेते प्रयत्नशिल आहेत. यासाठी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांची खलबतं झाल्याची खात्रीलायक सूत्रांनी पुढारी न्यूजला माहिती दिली आहे.
या निवडणूकांसंबधी महायुतीमधील तिन्ही पक्षांचे चर्चेअंती एकमत झाले असल्याची माहिती आहे. यामुळे महत्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्याचा बैठकीत निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीतच लवकरच महामंडळ वाटप करण्यावर चर्चा झाली असून. लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या मंहामडळाच्या वाटपातून प्रामाणिक नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांसाठी मुंबई महापालिका महत्वाची आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा), भाजप यांच्यामध्ये महापालिकेवर सत्ता स्थापीत करण्याचे प्रयत्न आहेत. अनेक वर्षे याठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. आता भाजपकडून महायुतीच्या माध्यमातून महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न असणार आहे.