

नाशिक : महापालिका निवडणुकांसाठी प्रभागरचनेचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम राज्यांच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आला असून, प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सूचनांसाठी दि. ४ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. आधीच्या कार्यक्रमानुसार दि. २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान शासकीय सुट्यांमुळे हरकती व सूचनांसाठी केवळ तीनच दिवस उपलब्ध होत असल्यामुळे सुधारित कार्यक्रम जारी करत हरकती व सूचनांसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेसंदर्भातील याचिकांवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला केला आहे. चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला फेर प्रभागरचनेचे निर्देश दिले होते. नगरविकास विभागाने २०२२ मधील प्रभागरचनेबाबत घेतलेले आदेश कायम ठेवत, त्यानुसार महापालिकांना चारसदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे १२२ सदस्यसंख्या असलेले चारसदस्यीय २९ व तीनसदस्यीय दोन अशा एकूण ३१ प्रभागांची प्रारूप रचना तयार केली. महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पुन्हा सीमा निश्चिती, महामार्ग तसेच रस्त्यांच्या सीमा, त्याचप्रमाणे अन्य हरकतींची तपासणी केली. त्यानुसार ३१ प्रभागांची प्रारूप रचना बंद लिफाफ्यात महापालिकेने दि. ५ ऑगस्ट रोजी राज्य शासनाला सादर केली होती. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. आधीच्या कार्यक्रमानुसार दि. २ ते २८ ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रसिद्धी व त्यावर हरकती व सूचनांसाठी मुदत देण्यात आली होती. सुधारित कार्यक्रमानुसार दि. २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान प्रारूप प्रसिद्धी व त्यावर हरकती- सूचनांसाठी मुदत देण्यात आली आहे.
प्रारूप प्रभागरचनेवरील प्राप्त हरकती व सूचनांसाठी दि. २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेण्यात येणार होती. सुधारित कार्यक्रमानुसार हरकती व सूचनांसाठी मुदत वाढवून देण्यात आल्यामुळे आता दि. ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी दिली जाणार आहे. प्रभागरचनेचा उर्वरित कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. अंतिम प्रभागरचना दि. ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान प्रसिद्ध केली जाईल.