

नंदुरबार (तळोदा ) : सत्ता असो वा नसो, शिवसेनेच्या कार्यात कधीही खंड पडलेला नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा कोणत्याही निवडणुका आल्या तरी शिवसैनिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. आपल्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत आहे, असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
शनिवार (दि16) रोजी तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात शिंदे गटाच्या वतीने रक्षाबंधन निमित्त पाच हजार महिलांना भेटवस्तू वाटप सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते.
जिथे आमदार, खासदार, मंत्री असतात तिथे कामे होतात. पण तळोद्यातील शिवसैनिक कोरड्या नदीत नाव चालवत आहेत. शिवसेनेने कार्यकर्त्यांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण शिकवले आहे. काँग्रेसने शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला. सण-उत्सवांच्या काळात आमच्या मागे पोलिस लावले जायचे.
शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने लोकांच्या प्रश्नांसाठी संपर्क कार्यालय सुरू केले. मात्र त्याच कार्यालयासह 200 जणांना अतिक्रमणाची नोटीस देण्यात आली होती. नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला, परंतु एकनाथ शिंदे यांनी कारवाईला स्थगिती देऊन जनतेला दिलासा दिला. शहरातील बारगळ जहागीरदारीचा प्रश्न सुटेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असेही रघुवंशी यांनी यावेळी सांगितले.
आमदार आमश्या पाडवी म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. अक्कलकुवा मतदारसंघात तब्बल 1 लाख 5 हजार महिला लाभार्थी आहेत. तसेच वयोश्री योजनेत पूर्वी 500 रुपये मानधन मिळायचे, आता 1500 रुपये लाभार्थ्यांना मिळत आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, जिल्हाप्रमुख गणेश पराडके, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, धडगाव नगरपंचायत धनसिंग पावरा, महिला आघाडी समन्वयक सरिता कोल्हे-माळी, महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, जिल्हा संपर्कप्रमुख कविता चौधरी, तालुकाप्रमुख अनुप उदासी, शिवसेना लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी, शहरप्रमुख जितेंद्र दुबे, माजी सभापती हितेंद्र क्षत्रिय, शहर संघटक सुरज माळी, ललित जाट, अमृतसिंग पावरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.