

नाशिक : कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. मुंबईसह, नाशिक व कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढविणार असून या निवडणुका आम्ही जिंकू, असा दावा शिवसेने (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर पदाधिकारी बैठकीसाठी नाशिक दौऱ्यावर आलेले खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे. आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. मांसबंदीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचे समर्थन करताना राऊत यांनी, असा स्वातंत्र्य दिन आम्ही पहिल्यांदाच पाहिल्याची मिश्किल टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली आहेत. या देशाला प्रगतिपथावर नेण्याचे श्रेय नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाते. प्रत्येक पंतप्रधानांनी यात काही ना काही योगदान दिले आहे. मात्र, आपला धार्मिक देश धर्मांध केला इतकेच भाजपचे गेल्या दहा वर्षातील योगदान आहे. ते जातीय, धार्मिक फूट पाडत असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते धोकेदायक आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला, त्यांनी सुरूवात स्वत:पासून करावी, अशी टीकाही राऊत यांनी केली.
हरियाणामधील एका गावामध्ये 2022 मध्ये सरपंच पदाची निवडणूक ईव्हीएम मशीनवर झाली. तेथील मोहितकुमार याचा पराभव झाला. मात्र, त्यांना आपणच निवडून येणार असा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी न्यायालयीन लढाई लढली. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा विजय झाला. ईव्हीएमची लढाई अशीच सर्वांनी लढल्यास पंतप्रधान मोदी राहणार नसल्याचे खासदार राऊत म्हणाले.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली पण कमावलेले टिकवता आले पाहिजे, असे विधान केले आहे. या विधानाचा आधार घेत, शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता, अशा शब्दांत खा. राऊत यांनी टीकास्त्र डागले. नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम नेते असल्यामुळे त्यांनी लॉटरी शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका असेल अशी टीका राऊत यांनी केली.