

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक यंदा पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीत होत आहे. यात एका प्रभागात अ, ब, क आणि ड अशा चार प्रवर्गाच्या जागा असून, ईव्हीएमवर प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका राहणार आहेत. यात अ प्रवर्गासाठी पांढरी, ब साठी फिकट गुलाबी, क साठी पिवळी, तर ड साठी निळ्या रंगाची मतपत्रिका असेल, असे सोमवारी (दि.५) ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविताना निवडणूक अधिकारी तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. यात सोमवारी प्रत्येक प्रभागात मतदान यंत्रावर कशा प्रकारे मतपत्रिका लावण्यात येणार आहेत, याबाबतची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत मतदारांमध्ये मतदान करताना संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ईव्हीएमवर प्रत्येक प्रभागातील प्रवर्गांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका लावण्यात येणार आहेत.
प्रभागातील चारही गटामध्ये हे विविध प्रवर्गांचे उमेदवार राहणार आहेत. मतदारांना चार वेळा मतदान करता येणार आहे. यात एका रंगातील उमेदवारांसाठी एकदाच मतदान यंत्राचे बटन दाबावे लागणार आहे. असे चार रंगातील उमेदवारांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे चार वेळा मतदान करावे लागणार आहे. यात ज्या प्रवर्गातील एकाही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर त्यात्या रंगाच्या मतपत्रिकेत सर्वात शेवटचे बटन हे नोटाचे राहणार आहे. नोटाचे बटन प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र राहणार आहे.
कुठे ३ तर कुठे ४ बॅलेट युनिट
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काही प्रभागांमध्ये एकाच जागेसाठी मतपत्रिकेचे विभाजन दोन बॅलेट युनिटमध्ये होत असल्याबाबत मतदार व उमेदवारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, या उद्देशाने महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रसार माध्यमासमोर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. १५ पेक्षा अधिक उमेदवार असलेल्या ठिकाणीच असे जास्तीचे बॅलेट युनिट लागले आहेत. यात काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी चार बॅलेट युनिटमध्ये करावे लागत आहे.
असे असेल मतपत्रिकेचे रंग
प्रवर्ग अ साठी पांढरा
प्रवर्ग ब साठी फिकट गुलाबी
प्रवर्ग क साठी फिकट पिवळा
प्रवर्ग ड साठी फिकट निळा
...तरच बीप आवाज येईल
या रंगनिहाय मांडणीमुळे मतदारांना योग्य बटन ओळखणे सुलभहोणार आहे. एकाच मतदान यंत्रावर आवश्यक ती दोन बटने दाबता येणार आहेत. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, चौथे बटन दाबल्यानंतरच बीपचा आवाज येणार असल्यामुळे सर्व आवश्यक बटणे दाबेपर्यंत मतदाराला मतदान पूर्ण झाल्याचा चुकीचा समज होणार नाही