मुखियाची बांधबंदिस्ती महायुतीतील बेकीची परिणती?

मुखियाची बांधबंदिस्ती महायुतीतील बेकीची परिणती?

[author title="नाशिक : मिलिंद सजगुरे" image="http://"][/author]
केंद्र-राज्यातील सत्ता, पाच विधानसभा क्षेत्रांत स्वकीय आमदारांची रसद, विरोधकांची झालेली पडझड आणि राज्यात पंचेचाळीस प्लस जिंकण्याचा आत्मविश्वास या बाबी अनुकूल वातावरणाची प्रचिती देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोनदा येऊन केलेली बांधबंदिस्ती चर्चेचा विषय बनला आहे. मुखियाचा दुहेरी दौरा महायुतीतील बेकीची परिणती की खुंटा हलवून बळकटीकरणाचा प्रयत्न हा मुद्दा आता केंद्रस्थानी आला आहे.

नाशिकमध्ये महायुती उमेदवार कोण यावर दीर्घकाळ खल झाल्यानंतर अखेर हेमंत गोडसे यांना शिंदेंच्या शिवसेना कोट्यातून रिंगणात उतरवण्यात आले. मात्र, त्यानंतर राजी-नाराजीचे रव उमटून ते थेट राज्याच्या मुखियापर्यंत गेल्याने स्थानिक स्तरावर गडबड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कधी छगन भुजबळ, कधी आ. माणिकराव कोकाटे, कधी भाजपचे दिनकर पाटील यांनी गोडसे यांच्याबाबत प्रत्यक्षाप्रत्यक्ष नाराजीचा सूर आळवत मुहायुतीतील बेकी अधाेरेखित केली. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा स्वपक्षासाठी तर व्दितीयोध्यायात नाशिकमधील संस्था कारभाऱ्यांसाठी जोर-बैठकांचे सत्र घेत गोडसेंसाठी पूरक वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. नाशिककरांची दुखरी नस शोधून त्यावर आश्वासनांची फुंकर घालत संबंधित हस्तींना कवेत घेण्यात त्यांनी कसूर सोडली नाही. अगदी भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांशी वन-टू-वन चर्चा करण्यात आणि भाजपतील नाराज दिनकर पाटलांच्या दारात जाण्यासही मुख्यमंत्र्यांना कमीपणा वाटला नाही.

नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. महायुतीच्या गोडसेंना महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचितच्या करण गायकर यांचे आव्हान असणार आहे. गोडसे विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सरसावले आहेत, तर ती येनकेन रोखून शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. तथापि, उमेदवार निवडीपोटी गोडसे यांच्याऐवजी सक्षम पर्याय म्हणून मंत्री छगन भुजबळ, आ. माणिकराव कोकाटे ही नावे पुढे आली होती. शिवाय, भाजपचाच गोडसे यांना मोठा विरोध होता. मात्र सर्व प्रतिकूल घटकांना मागे सारत गोडसे यांनी उमेदवारी प्राप्तीत बाजी मारली. किमान, उमेदवार जाहीर झाल्यानंतर तरी महायुतीत ऐक्याचे वारे वाहायला लागतील, अशी अपेक्षा असताना गोडसे यांच्या प्रचारफेऱ्यात अभावानेच ओळखीचे चेहरे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आल्याची दखल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. त्यानंतर तीन दिवसांच्या अंतराने मुख्यमंत्र्यांनी दोनदा नाशिकवारी करून स्वकीयांना आपलेसे केल्याचे वरकरणी तरी जाणवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बांधबंदिस्तीचे प्रत्यक्ष फलित ४ जून रोजीच्या निकालात दिसून येणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात एकमेव गड
महायुतीतील दोन्ही सहकारी पक्षांचा प्रखर विरोध राहूनही शिवसेना शिंदे गटाने नाशिकची जागा एवढी प्रतिष्ठेची करण्याचे कारण म्हणजे उतर महाराष्ट्रातील सहापैकी केवळ इथली जागा पक्षाकडे आहे. उर्वरित पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. एकसंध शिवसेनेत भाजपच्या युतीत लढताना गोडसे यांनी २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांत चढ्या फरकाने विक्रमी विजयाची नोंद केली होती. या स्थितीत नाशिक हातून सुटले तर इतरत्र पक्षाला पाय रोवणे दुरापास्त असल्याची नेतृत्वाला जाण आहे. निवडणूक दृष्टिपथात असताना मुख्यमंत्रीपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक मुक्कामी गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर करून सहयोगी पक्षांची नाराजी ओढवून घेतली होती. अखेर अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुललेल्या नाशिकची महायुतीची उमेदवारी प्रतिष्ठेची करून मुख्यमंत्र्यांनी पदरात पाडून घेतली, हे विशेष !

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news