सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
मनेगावसह २२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटून तीन ते चार महिने उलटूनही दुरुस्ती न केल्याबद्दल खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठेकेदार कंपनीवर संताप व्यक्त केला. जोपर्यंत पाइपलाइन दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावे अन्यथा मी स्वतः येऊन काम बंद पाडेल, असा इशारा दिला.
मंगळवारी (दि. २४) तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीला जाब विचारला. लासलगाव-ठाणगाव टाकेद रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मनेगावसह २२ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी दापूर फिल्टर प्लांट परिसर तसेच फिल्टर प्लांट ते जलकुंभ या दरम्यान फुटली आहे.
परिणामी गेल्या तीन-चार महिन्यांपासून संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी आठ दिवसांपूर्वी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने खासदार वाजे यांच्या सूचनेनुसार बैठक बोलावण्यात आली.
बैठकीस तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता इमरान शेख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता श्रद्धा मोरे, ठेकेदार श्रीजी कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी प्रीतुल चौधरी उपस्थित होते.
बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेत गावाची पाणीटंचाई दूर करण्याचे आदेश देण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या बैठकीमुळे पाणीप्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी भोकणीचे सरपंच अरुण वाघ, मुसळगावचे माजी सरपंच रवींद्र शिंदे, मनेगावच्या उपसरपंच शोभा भालेराव, राजाराम मुरकुटे, माळवाडीच्या सरपंच जयश्री आव्हाड, संपत आव्हाड, दापूरचे ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बोरसे, दातलीचे माजी सरपंच लहानू भाबड, खोपडीचे सरपंच गणेश घोलप यांच्यासह विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठेकेदारास खासदार वाजे यांचे खडेबोल
ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी प्रीतुल चौधरी यांनी खासदार वाजे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार वाजे यांनी रस्त्याचे काम बंद पाडण्याचा तसेच आंदोलनाचा इशारा देत सभागृहाबाहेर पडले. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण झालेले दिसले.
निष्काळजीपणा ठेकेदाराचा, मग बिल का भरावे
चार महिन्यांपूर्वी बैठक होऊनही पाइपलाइन दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न करत खासदार वाजे यांनी निष्काळजीपणामुळे गावांना चार महिन्यांचे वीजबिल का भरावे लागावे, हे बिल संबंधित ठेकेदाराने भरावे, अशी मागणी केली. पिण्याच्या पाण्यासारख्या संवेदनशील विषयाकडे प्रशासन व ठेकेदार उदासीन का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या