

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे रेल्वेमार्गावरून राजकीय रणकंदन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही यात उडी घेतली आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा मूळ आराखड्यानुसार संगमनेर, नारायणगाव आणि मंचरमार्गेच व्हायला हवा, अशी ठाम भूमिका मांडत, राज्याचा हा 'गोल्डन ट्रॅगल' जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन हा मार्ग मार्गी लावावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
या रेल्वेमार्गावरून सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि तांत्रिक वादावर बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, मूळ अलाइनमेंटचा भाग हा शेती समृद्ध झोन असून, महत्त्वाचा दुवा आहे. जगात १४ ठिकाणी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहेत. तिथे जर सर्व गोष्टी को-अॅडजस्ट होत असतील, तर इथेच जीएमआरटीचा प्रॉब्लेम काय. २९ देशांचे सायंटिस्ट मिळून तोडगा काढू शकतात. रेल्वे मंत्रालयाने यावर मार्ग काढावा.
सध्या प्रस्तावित नाशिक-शिर्डी-पुणे-नगर हा मार्ग नेमका कोणाच्या भल्यासाठी बदलला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. माझ्या मतदारसंघातील शेतकरी ५० टक्के जमिनी देण्यास तयार असताना अचानक प्रकल्प रद्द होणे अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प करत एलिव्हेटेड किंवा बोगद्यांच्या माध्यमातून जीएमआरटीला कोणताही धक्का न लावता मूळ मार्गानच नेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. मूळ मार्ग हा 'अॅग्रीकल्चर रिच झोन' असल्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
फडणवीसांच्या 'इन्फ्रा मॅन' प्रतिमेचे कौतुक
एमआरआयडीसीच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात या प्रकल्पाची स्थापना झाली. फडणवीस यांच्या काळात आलेखन झाले. फडणवीस यांची दिल्लीत 'इन्फ्रा मॅन' म्हणून ओळख असून, मराठी माणसाचे नाव आदराने घेतले जाते, असे सांगत खासदार डॉ. कोल्हे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. राज्याचा हा 'गोल्डन ट्रॅगल' जोडण्यासाठी फडणवीस यांनी वैयक्तिक पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पक्षांतराच्या दबावावर टीका खासदार
अमोल कोल्हे आणि राजाभाऊ वाजे यांनी पक्ष बदलला तरच नाशिक- पुणे रेल्वेमार्ग होईल, या विधानाचा समाचार घेताना डॉ. कोल्हे म्हणाले की, विकासकामे ही दबाव टाकून पक्षांतरासाठी आहेत का. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याची वस्तुस्थिती असून,
विकासकामांसाठी पक्षांतराची ऑफर आल्यास 'विचार करू' असे म्हणालो होतो, 'जाऊ' असे म्हणालो नव्हतो, असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून रेल्वेमार्ग होणे राज्यासाठी गरजेचे आहे. निधीवाटपात विरोधी खासदारांवर अन्याय होत असल्याचेही त्यांनी समर्थन केले.
विचार पोहचू न देण्याची वृत्ती घातक
'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका खासगी मराठी वाहिनेने टीआरपी व उत्पन्नाचे कारण देत बंद करण्याचे कारण दिले. त्याचे राज्यभर सामाजिक व राजकीय पडसाद उमटले. प्रेक्षकांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
फुलेंचे विचार तळागाळापर्यंत पोहचू न देण्याची वृत्ती घातक असल्याचे स्पष्टीकरण मालिकेत फुलेंची भूमिका निभावणारे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. ही मालिका 'मराठी वारसा' या युट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात येत असून, त्याचे दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. ही मालिका सहा भाषांत प्रसारित करण्यात येणार आहे. यावेळी सावित्रीची भूमिका साकारणाऱ्या नाशिकच्या अभिनेत्री क्षमा देशपांडे उपस्थित होत्या