Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध

Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध
AI Cameras Security
AI Cameras SecurityPudhari
Published on
Updated on

गोव्यात असा एक घटक आहे की तो प्रत्येक नव्या अत्याधुनिक उपकरणाला, चांगल्या गोष्टीला नेहमीच विरोध करत असतो. दक्षिण गोव्यामध्ये काही ठिकाणी एआय कॅमेरे बसवले आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, वाईट घटनांची नोंद करणे होत आहे. मात्र, या कॅमेऱ्यांनाही माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यासह काही नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. हे कॅमेरे काढण्याची मागणी केले आहे. बोरी येथे जुना पूल कमकुवत झाल्याबद्दल तेथे नवा पूल बांधण्याचे ठरले आहे. मात्र, त्यालाही तेथील लोक विरोध करत आहेत. कोकण रेल्वेलाही याच लोकांनी विरोध केला होता. विरोधाची ही मानसिकता विदेशात हे आहे, ते आहे असे सांगणाऱ्यांनी तरी बाळगू नये.

गिरीश चोडणकरांचे घूमजाव

स्मार्ट मीटर्स संदर्भात माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विद्युत भवनवर मोर्चा नेला होता. मात्र या मोर्चाशी काँग्रेसचा काही संबंध नसल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्यातील मतभेद दाखवून दिले. मात्र दुसऱ्याच दिवशी घूमजाव करत हा मोर्चा म्हणजे काँग्रेसचाच एक भाग असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. गोव्याचे काँग्रेस डेस्क इन्चार्ज माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात चोडणकर यांना कानपिचक्या दिल्याने हे घूमजाव करावे लागल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दिखावा केला जात असला तरी अंतर्गत बरीच नाराजी आहे. पाटकर व चोडणकर असे दोन गट पडले आहेत. कुडचडेमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले अमित पाटकर यांना चोडणकर हे प्रदेशाध्यक्ष असल्याने कितपत दाबून ठेवतात हे येणारा काळच ठरवील.

बाबूंना भाजप उमेदवारीची स्वप्ने

पेडणे मतदारसंघातून भाजपचाच आमदार सध्या असताना अनेकजण भाजप उमेदवारीसाठी शर्यतीत आहेत. एकेकाळी उपमुख्यमंत्री असलेले व सध्या ना घर का ना घाटका झालेले मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे उमेदवारी मिळण्याची स्वप्ने पाहत आहेत. भाजपच्या बैठकांना हे आवर्जून उपस्थिती दाखवत आहेत. अजूनही भाजपचा कार्यकर्ता असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मात्र विद्यमान आमदाराने काहीच काम केलेले नाही असा आरोप करत ते भाजपचीच लक्तरे काढत आहेत. त्यामुळे भाजप त्यांचे नाव तरी पेडणे मतदारसंघाच्या यादीत समाविष्ट करेल की नाही ही शंका आहे. मात्र बाबू आजगावकर यांना भाजप त्यांच्या नावाचा विचार करील असा विश्वास आहे. नावाचा विचार झाला नाही तरी ते निवडणूक लढवतील हे नक्की.

पोरांनी केले आणि वाऱ्याने नेले

मराठीमध्ये एक म्हण आहे की, 'पोरांनी केले आणि वाऱ्याने नेले.' तसाच काहीसा प्रकार रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षामध्ये सध्या सुरू आहे. या पक्षात ज्येष्ठ अनुभवी राजकीय नेता नसल्याने सर्व युवाच हा पक्ष चालवतात. मात्र, त्यांच्यात राजकारणात यशस्वी होण्यासाठी हवी असलेली परीपक्वता नाही. त्यामुळेच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्याच आमदारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे तर दुसरीकडे पक्षातून नियम डावलून आपल्याला काढल्याचा दावा करुन पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकलेला आहे. त्यामुळेच 'पोरांनी केले आणि वाऱ्याने नेले', असे अनेकजण सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत आहेत.

निदान २० टक्के तरी गोमंतकीय आहेत

एनसीईआरटीच्या नव्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये फक्त 20 टक्के गोमंतकीयांचे साहित्य सामावून घेतले आहे. 80 टक्के महाराष्ट्रातील लेखक आहेत, असा दावा काहीजण करताना दिसत आहेत. तसे पाहता यापूर्वी 80 नव्हे तर 99 टक्के महाराष्ट्रातील लेखकांचे साहित्य गोव्यातील मराठी पुस्तकांमध्ये अंतर्भूत करण्यात येत होते आणि लाखो गोवेकरांनी ते शिकत होते. ग. दी. माडगूळकर, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, शांता शेळके आदी दिग्गज लेखकांचे साहित्य वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तकात आहे आणि ते असायलाच हवे. त्यावर आक्षेप घेणे चुकीचे. नव्या शिक्षण पद्धतीनुसार किमान 20 टक्के गोमंतकीयांना सामावून घेतले आहे, पुढे हा टक्का आणखी वाढेल, अशा प्रतिक्रिया अनेक मराठी साहित्यिक व्यक्त करत आहेत

बाबांचा जनता दरबार

मडगावात सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी पुन्हा सुरू केलेल्या जनता दरबारामुळे मडगावच्या नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळू शकते. मात्र, या उपक्रमाचा आणखी एक उद्देश असू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे; तो म्हणजे कामत यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावान कार्यकर्ते यांना आपल्या राजकीय मार्गदर्शकासोबत लोकांसमोर येण्याची आणि आपली ओळख अधिक दृढ करण्याची संधी मिळणे. या कार्यकर्त्यांपैकी अनेकजण आगामी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. किंबहुना, कामत यांच्या गटातील काही संभाव्य उमेदवार या दरबारात प्रामुख्याने दिसून आले. याचे कारण तुम्हाला माहित आहेच ना? दिगंबर कामत यांच्या 'जनता दरबारा'मुळे निवडणुकीच्या तयारीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

गोव्यातही एकाच पक्षाचे दोन गट ?

सध्या आरजीपीमधील अंतर्गत वादाची तीव्रता पाहता लवकरच पक्षाचे दोन गट होतील, असे चित्र दिसत आहे. काही पदाधिकारी हे वीरेश बोरकर गटाचे असल्याची खुलेआम वाच्यता आत्तापासूनच सुरू झाली आहे. तर मग दुसऱ्या गटाचा प्रमुख कोण? याची चर्चाही सुरू आहे. पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर हे सुरुवातीपासूनच पक्ष फोडण्याच्या आणि हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा पक्ष पदाधिकारी करत आहेत. मागील काही महिन्यांपासूनच अंतर्गतपणे दोन गट कार्यरत असल्याचा संशय होता. मात्र सध्याच्या घडामोडी पाहता या संशयाला बळ मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच शिवसेना - राष्ट्रवादीसारखे एकाच पक्षाचे दोन गट लवकरच गोव्यात पाहायला मिळतील, अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

चर्चिल-खर्गे भेटीवर युरींचे मौन

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काका चर्चिल आलेमाव यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे. तसेच, आपण काँग्रेसच्या विचारसरणीशी ठामपणे बांधील आहोत, या चुलत भाऊ वॉरेन आलेमाव यांच्या विधानावरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या मौनामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होत आहेत की, या विषयावर मत मांडण्याची वेळ आली तर युरी काय भूमिका घेतील. काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख असलेले विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे अमित पाटकर यांना हटवण्याच्या प्रकरणावेळी जसे म्हणाले होते, तसेच 'पक्ष कार्यकर्त्यांनी नेतृत्वाच्या निर्णयांचे पालन केले पाहिजे,' असेच पुन्हा सांगतील का ?

आणीबाणीची गोष्ट

२५ जून रोजी भाजपशासित राज्यांत न चुकता आणीबाणीचा हा काळा दिवस 'साजरा' केला जातो. विद्यमान सत्तेला हुकूमशाही राजवट म्हणताना तुम्ही काय केले होते याचे स्मरण त्यांच्या नेत्यांना आणि लोकांना करून देण्यात येत असते. दरवर्षी यानिमित्ताने मोठी भाषणे होतात. अर्थातच तो काळा दिवस होता याची उजळणी केली जाते. गोव्यातही आणीबाणीचा निषेध करण्यासाठी कार्यक्रम झाला. अनेक युवकांचाही त्यात समावेश करण्यात आला होता. त्यांच्यापर्यंतही हा काळा इतिहास पोचला तर कुणी काँग्रेसला मत द्यावे की नाही याबाबत कुंपणावर असेल तर त्याचे मतपरिवर्तन नक्कीच होईल.

ईव्हीएम मोकळे करा

न्यायालयाच्या आदेशानुसार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास ३००० ईव्हीएम यंत्रे सील करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणूक कधीही होऊ शकते हे लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी ही ईव्हीएम मोकळी करावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे. ही ईव्हीएम मोकळी न केल्यास मोठी प्रशासकीय अडचण निर्माण होऊ शकते. मात्र विरोधक म्हणत आहेत, ईव्हीएम हेच भाजपचे निवडणूक जिंकण्याचे शस्त्र आहे, म्हणून त्यासाठी आयोगाचा जीव तुटतो आहे. खरे खोटे देवच जाणे.

उठसूट खटले नको

गोव्यात काही जणांना उठसूट खटले भरण्याचे खूळ असते. राज्यात सर्वाधिक खटले जमिनींसंबंधी आहेत. १० खटल्यांचा निपटारा करेपर्यंत नवीन हजार खटले दाखल होतात अशी सध्या स्थिती आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी लोकांना आवाहन केले आहे की उठसूट खटले भरू नका. शक्यतो हे वाद सामोपचाराने, मध्यस्थीने मिटवा. यात लोकांचा वेळ व पैसा वाया जातो. मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की वन हक्क विषय आणि इतर प्रलंबित खटले ३१ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचा प्रयत्न करू. भाजपची पुन्हा सत्ता येईल तेव्हा त्यांना कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहायचा असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news