

Does Mobile Affect Sleep Health News Explained
नाशिक : निल कुलकर्णी
झोपण्यापूर्वी मोबाइल फोन वापरण्यांपैकी ७२ टक्के लोकांना निद्रानाशासह झोपेच्या समस्या आणि अन्य विकार जडले असल्याचे वास्तव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ॲण्ड न्युरो सायन्स (निमहान्स) या राष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
रात्री झोपण्यापूर्वी सहज म्हणून हातात घेतलेला मोबाइल त्यातील 'अलगोरिदम'आणि 'एआय' ची जादुई प्रलोभने यामध्ये वापरकर्त्यला जाळ्यात फसवत आहे. 'एआय' तंत्रज्ञान समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या 'यूजर्स'ची आवड, कल, पसंती या खासगी गोष्टीचा 'डेटा' नोंदवून वारंवार त्यात त्या विषयांचे व्हिडीओ, संदेश, रिल्स पाठवते. त्यामुळे गेल्या सहज काही मिनिटांसाठी झोपण्यापूर्वी कुणाचे संदेश आले आहेत का म्हणून बघण्यास घेतलेल्या मोबाइलने वापरकर्ता 'मोह, आकर्षणांच्या'जाळ्यात फसतो. तीव्र झोप येत असताना डोळे आणि मेंदू थकलेला असूनही तो दीड ते तीन तास मोबाइल सोडत नाही. या 'टेम्पटेशन'च्या माेहात अडकलेल्या ७२ टक्के लोकांना झोपेशी संबंधित आजार झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
'निमहान्स' ने आपल्या सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे की, मोबाइलचा वाढता वापर विशेषत: झोपण्यापूर्वी दोन तासांत झालेला वापराने अनेकांना झोपेच्या समस्या, निद्रानाश असे आजार बळावले आहे. झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाइलचा वापर टाळणे, ध्यान, शांत संगीत, दीर्घश्वसन आदीने निद्रानाश टाळता येतो, अशी माहितीही अभ्यासकांनी दिली आहे.
झोपेचे खोबरे करणारे 'ब्ल्यु पॉयझन'
मोबाइल स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपेची समस्या वाढते. निळ्या प्रकाशामुळे शरीरातील 'मेलाटोनिन' या झोपेच्या हॉरमोन्सचे उत्पादन थांबते. ज्यामुळे मेंदूला दिवस असल्याची जाणीव होते आणि झोप येण्यास उशीर होतो. ही समस्या टाळण्यासाठी, झोपण्यापूर्वी मोबाइल वापरणे टाळावे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी माेबाइल नकोच. ज्यांना रात्रीचे काम असेल त्यांनी निळा प्रकाश फिल्टरचा वापर केल्यास स्क्रीनची चमक कमी होण्यास मदत होते, अशी माहिती मेंदूविकार तज्ज्ञांनी दिली.
वयोगट आणि झोपेचा कालवधी
नवजात बाळ (तीन महिन्यांपर्यंत)- १६ ते १८ तास
४ ते १२ महिन्यांचे बाळ -१२ ते १६ तास
मुले (१ ते ५ वर्ष)- १० ते १४ तास
शालेय विद्यार्थी (६ ते १२ वर्ष)- ९ ते १२ तास
किशोरवयीन(१३ ते १७)- ८ ते १० तास
प्रौढ (१८ते ४०)- ७ ते ९ तास
४५ ते ५० वर्षांचे मध्यवयीन- ७ तास
मोबाइल वापरकर्त्याचा फोन टाईम
६ तासांहून अधिक- १८ ते २० टक्के
५ ते ६ तास - ४८ टक्के
१ तासांपेक्षा कमी- ५ टक्के
१ ते दोन तास- ७ टक्के
३ ते ४ तास २२ टक्के
निद्रानाश टाळण्यासाठी हे करा
झोपण्याच्या किमान १ तास फोनचा वापर टाळा
शांत झोप येण्यासाठी १० ते १५ मिनिटे ध्यान, ओंकार आवर्तन प्रभावी
शांत संगीताचाही झोपेसाठी उपयोग, डोक्यावर, हात पायांना तेल लाऊन मसाज करावी.
मोबाइलमध्ये पाहिला जाणारा कंटेट
गेम्स ९४ टक्के
सोशल मीडिया ९२ टक्के
मनोरंजन सिनेमा
माहितीपट आदी-८३ टक्के
'एआय'मुळे वापरकर्ता जी गोष्ट सर्वाधिक बघतो. तीच गोष्ट सर्वाधिक 'पॉपअप' होते. युजर्सच्या पसंतीचे 'कंटेंट' मोबाइल देत असतो. तुम्ही काय सर्च करता, लोकेशन सुरू असेल तर संभाषणही टॅप हाेऊन त्याच आशयाचे जाहिराती कंटेट टाकल्या जातात. या दृष्टचक्रात यूजर अडकतो आणि त्यामुळे झोपेचे खोबरे होते.
डॉ. सुधीर संकलेचा, नवमाध्यम अभ्यासक.
डोळे मिटून विचार कमी करत करत माणूस झोपच्या अधीन होतो. मात्र, झोपण्यापूर्वी माेबाइल बघितल्यामुळे डोळे सक्रिय होतात. मेंदूला विचार खाद्य मिळाल्याने तेही एॅक्टिव्ह होतात. विचारशृंखला सुरूच राहते. शांत झोपेसाठी लागणारी स्थित यामुळे विपरीत होते. मोबाइलमुळे झोप येण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे निद्रानाशाचे रुग्ण वाढत आहेत.
डॉ. श्रीपाल शाह, मणके व मेंदूविकार तज्ज्ञ