

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे सुरू झाल्याचे शहरभर धुळीचे साम्राज्य पसरले असताना तब्बल २५० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदाईची परवानगी मागणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला मनपाने रेड सिग्नल दाखविला आहे. एमएनजीएलच्या रस्ते खोदाईमुळे नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने एमएनजीएलला रस्ते खोदाईची परवानगी नाकारली.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना आता वेग आला आहे. सिंहस्थांतर्गत हाती घेण्यात आलेली शहरातील रस्ते, रुग्णालय, घाट, नवीन पूल आदी कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करायची आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाने सिंहस्थासाठी शहरात ५६ रस्ते कामांचा प्रस्ताव सिंहस्थ प्राधिकरणाला दिला होता. त्यानंतर प्राधिकरणाने २९ रस्त्यांसाठी दीड हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
त्यांच्या निविदा काढल्या असून, २९ पैकी १८ रस्त्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ही कामे सुरू झाली आहेत. शहरात सर्वत्र सिंहस्थ कामांसाठी खोदकाम सुरू असल्याने शहराची धुळधाण उडाली आहे. नाशिककर आधीच त्रस्त असतांना, त्यात एमएनजीएलनेही २५० किलोमीटरचे रस्ते फोडण्याची परवानगी मागितली होती. त्यास मनपाने नकार दिला आहे.
आधीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश
एमएनजीएल कंपनीला गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी महापालिकेने यापूर्वी २५४ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर कंपनीने दिवाळीपूर्वी १८० किलोमीटर लांबीचे रस्ते फोडण्याची परवानगी मागितली होती. त्यात पुन्हा २५० किलोमीटर रस्ते फोडण्याची परवानगी कंपनीला हवी होती. आधीच्याच खोदकामांमुळे नाशिककरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आधी दिलेल्या परवानगीनुसार कामे पूर्ण करा, असे निर्देश महापालिकेने एमएनजीएलला दिले आहेत.
सिंहस्थातील २९ पैकी १८ रस्त्यांचे कामे सुरू झाली आहेत. पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या तसेच ओएफसी केबलचेही काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने एमएनजीएल कंपनीला तुर्तास खोदकामाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा