

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून 'हरित नाशिक' साकारण्याचा संकल्प करण्यात आला असून, या अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. २८) कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानात प्रत्येक नाशिककराने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 'मिशन ग्रीन मान्सून' अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा आहिरे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव वनाधिकारी रणदिवे, मनपा उद्यान निरीक्षक विवेक भदाणे, वृक्षमित्र शेखर गायकवाड,
चंदू पाटील, जगबिर सिंग, मनोज साठे, वैभव देशमुख, मनीष बाविस्कर, भारती जाधव, राम खुर्दळ, भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, सागर बैरागी, गौरव देशमुख, सोनल दगडे आदी शहरातील पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या देवराई (फाशीचा डोंगर) या ठिकाणी वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या माध्यमातून झाडांची लागवड करण्यात आली आहे.
आजही या परिसरात वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. रविवारी मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत मिशन ग्रीन मान्सून अंतर्गतदेखील दोन हजार झाडांचे रोपण या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासोबतच शिंदे ग्रामपंचायतीचे सरपंच बाजीराव जाधव यांनीदेखील दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, रविवारी ग्रामपंचायत परिसरात दोन हजार वृक्षलागवड केली जाणार आहे.
तसेच शहरातील विविध ठिकाणावरून वृक्षलागवडीसाठी अनेक नागरिकांनी मागणी केली आहे. या जागेवरदेखील महानगरपालिका प्रशासनामार्फत रोपे पुरवण्यात येणार आहे. या प्रकारे सुमारे पाच ते सहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट येत्या रविवारी सुरू होणाऱ्या मिशन ग्रीन मान्सूनच्या माध्यमातून ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर झाडे उपलब्ध करून देणार महानगरपालिका व परिसरात सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवडीसाठी योग्य जागा उपलब्ध असेल अशा परिसरातून नागरिकांनीदेखील मागणी केली तर त्यांना झाडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जागा सुयोग्य असल्यास प्रशासनामार्फत या ठिकाणी मोफत झाडे पुरवली जाणार आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन हरित नाशिक चळवळीत सहभाग घ्यावा.
- गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री