

देवगड : पुढारी वृत्तसेवा
देवगड तालुक्यातील सर्वच आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बागायतदारांकडून बँकांमार्फत पीक विम्याचे हप्ते नियमित भरले जातात. मात्र चुकीचे निकष आणि अपुऱ्या सर्वेक्षणामुळे अनेक पात्र बागायतदारांना विम्याचा लाभ मिळत नाही. यात पीक विमा सर्वेक्षण करताना बापर्डे मंडळाला वारंवार वगळले जात आहे.
पीक विम्याच्या हवामान केंद्राच्या उभारणीपासून ते नुकसान सर्वेक्षणापर्यंत बापर्डे मंडळाला डावलण्याचे प्रकार का घडतात ? असा सवाल सभापती गणेश राणे यांनी पं. स. मासिक सभेत केला. देवगड पंचायत समितीची मासिक सभा सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली.
उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहा. गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांच्यासह सर्व सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. सभापती राणे म्हणाले, हवामान केंद्र पंचक्रोशीच्या मध्यवर्ती भागात असावे, असा नियम असताना प्रत्यक्षात तसे होत नसल्याने बागायतदारांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे कृषी विभागाने याबाबत तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या.
सिंधुरत्न योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती पुढील पंधरा दिवसांत सर्व विभागांनी लेखी स्वरूपात सादर करावी, अशी सूचना गटविकास अधिकारी चव्हाण यांनी केली. नारिंग्रे येथील शाळेचे छप्पर कोसळण्याच्या अवस्थेत असून मे महिन्याच्या सुट्टीतही संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्याचा विषय सदाशिव ओगले यांनी मांडला. विद्यार्थ्यांनी झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे का?
असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ न देता शाळेच्या छप्पराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिल्या. तालुका स्तरावर कार्यरत आपत्ती कक्षाच्या धर्तीवर ग्रामपंचायत स्तरावरही आपत्ती कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या कक्षात पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. टंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित कामांचे प्रस्ताव डिसेंबरपूर्वी सादर करावेत, असे गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले. सदस्यांच्या मागणीनुसार पंचायत समिती सभागृहाचे सुशोभीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
४ जून रोजी स्वच्छ भारत मिशन, ५ जून रोजी वृक्षारोपण आणि ७ जून रोजी 'संडे ऑन सायकल' हे उपक्रम पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोयरे येथे गोशाळा सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ इच्छुक असल्याचे सदाशिव ओगले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
सभेच्या शेवटी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खात्यांतील कामांचा आढावा सादर केला. सदस्य सलोनी तळवडेकर यांनी मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत तळवडे मतदारसंघातील विविध विभागांची किती कामे पूर्ण झाली आहेत, याची माहिती मागितली. त्यावर भूमी अभिलेख विभागाचे श्री. क्षीरसागर यांनी विभागासमोरील अडचणी व सुरू असलेल्या कामांची माहिती सभागृहासमोर मांडली.
टंचाईची कामे प्राधान्याने देवगड
तालुक्यातील नळयोजना दुरुस्तीची १७ कामे, बोअरवेल दुरुस्तीची ४ कामे तर नवीन विधन विहिरींची २६ कामे मंजूर आहेत. गाळ काढणे व विहीर दुरुस्तीची २ कामे मंजूर असल्याची माहिती बिडीओ श्री. चव्हाण यांनी सभागृहात दिली. आचारसंहिता सुरू असल्याने या समेत कोणतेही धोरणात्मक निर्णय किंवा ठराव घेण्यात येणार नसून केवळ विभागवार आढावा व चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरबांधणीसाठी आवश्यक ३२ कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच ग्रामपंचायतीमार्फत अधिकृत परवानगी दिली जाईल अन्यथा ती बांधकामे अनधिकृत म्हणून नोंदवली जातील. तालुक्यात २६ विंधन विहिरींची कामे मंजूर असून ज्याठिकाणी जागेचा प्रश्न सुटला आहे, ती कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. उर्वरित ठिकाणचे अडथळे दूर करून ती कामेही मार्गी लावली जातील.
- अरूण चव्हाण, बिडीओ-देवगड पं. स.