

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारातील एका खासगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेत वर्गात तसेच शाळेतील इतर ठिकाणी संबंधित शिक्षकाने वारंवार अनुचित स्पर्श केल्याची माहिती आपल्या आईला दिली. १६ जानेवारी रोजी पहिल्यांदा हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले असून, १९ जानेवारी रोजी पुन्हा अशाच स्वरूपाची घटना घडल्याचे मुलीने सांगितले.
या प्रकरणाबाबत फिर्यादी कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, समाधानकारक सहकार्य न मिळाल्याने त्यांनी अखेर सिन्नर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सांगितले.
यापूर्वीही घडला असाच प्रकार
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शिक्षक वर्गात इतर जागा उपलब्ध असतानाही विद्यार्थिनीच्या जवळ जाऊन बसणे, अंगाला चिकटून बसणे तसेच अनुचित पद्धतीने स्पर्श करणे असे प्रकार करत असल्याचे मुलीने सांगितले. यापूर्वीही वर्गातील अन्य एका विद्यार्थिनीसोबत अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली आहे.
पालक-पत्रकारांना धक्काबुक्कीचा प्रकार
संबंधित पीडित मुलीचे पालक या घटनेसंदभनि शाळेत गेले असता शाळा व्यस्थापनाने त्यांना सहकार्य करण्याऐवजी माहिती देण्यास टाळाटाळ करीत गोंधळ घातला. तसेच घटनेची माहिती घेण्यास गेलेल्या पत्रकारांना वृत्तांकनास तसेच शाळेत जाण्यास मज्जाव करीत धक्काबुक्की आणि अरेरावी केल्याचा निंदनीय प्रकार घडला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून संबंधित शिक्षक, व्यवस्थापनावर कारवाईची मागणी होत आहे.
66 धोंडवीरनगरच्या हद्दीत असलेली ही खासगी इंग्रजी माध्यमाची अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा असून, ख्रिस्ती मिशनरींच्या व्यवस्थापनाची शाळा आहे. सदर शाळेत २५० ते ३०० च्या दरम्यान विद्यार्थी शिकत आहेत. शाळेमध्ये दुसरीच्या विद्यार्थिनीबाबत अनुचित प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती शाळा व्यवस्थापनाचे जिलेश लुका यांच्याकडून समजली आहे. त्याबाबत तत्काळ संबंधित विस्तार अधिकारी यांना शाळेत जाऊन चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राजेश डामसे, गटशिक्षणाधिकारी, सिन्नर पंचायत समिती