

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अरण्यानी बायो कन्झर्वेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात जैवविविधता सर्वेक्षण शिबिर उत्साहात पार पडले. याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, विद्या परिषद सदस्य डॉ. अजित फुंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, अरण्यानी बायो कन्झर्वेशन सोसायटीचे सल्लागार सतीश गोगटे उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठ हे केवळ आरोग्य शिक्षणाचे केंद्र नसून निसर्ग संवर्धनासाठीही तितकेच सजग आहे. या पक्षी गणना शिबिराच्या माध्यमातून विद्यापीठाच्या परिसरातील जैवविविधतेचा वैज्ञानिक डेटा संकलित करत आहोत. अरण्यानी संस्थेच्या सहकार्याने आयोजित उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांत पर्यावरण साक्षरता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे यांनी सांगितले की, पक्ष्यांचा आपल्या सभोवताली असलेला अधिवास हे जैवविविधता परिपूर्ण असल्याचे द्योतक आहे. या उपक्रमामुळे सभोवतालचे पक्षी आणि त्यांची परिसंस्था ओळखू लागतो. हे शिबिर म्हणजे शाश्वत भविष्याकडे टाकलेले एक पाऊल आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी अरण्यानी बायो कन्झर्वेशन सोसायटीचे सल्लागार सतीश गोगटे यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात विविध दुर्मीळ 50 प्रजातींचे 270 पक्षी आढळले. पक्ष्यांना योग्य निवारा, खाद्य व अधिवास मिळाला तर संख्या वाढण्यास मदत होते. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यापीठात पक्ष्यांसोबत कीटक, सरपटणारे प्राणी व अन्य प्रजातींचा वावर आहे. या पक्षी गणनेच्या माध्यमातून ई-बर्ड या ॲपद्वारा माहिती अद्ययावत करण्यात येते. ती जगभरातील पक्षी अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे.
या उपक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी केले. या शिबिरामध्ये सतीश गोगटे, मनीष गोडबोले, गणेश वाघ, गंगाधर आघाव, रोहित मोगल, पद्मजा ओतूरकर, सीमा तंगडपल्लीवार, चारुशीला शुक्ल सहभागी झाले होते.
दुर्मीळ पक्ष्यांचा आढळला अधिवास
पक्षी गणनेत ह्यूम्स वॉर्बलर हा अत्यंत दुर्मीळ पक्षी नाशिकमध्ये पहिल्यांदा दिसला. समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीपर्यंतच्या पर्वतीय जंगलांत तो आढळतो. चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी असून तो गाणे गुणगुणल्यासारखा उच्चस्वरात आवाज करतो. त्याच्या झाडांवरील जीवनशैलीमुळे आणि रंगांमुळे त्याला पाहणे कठीण होते. तो सतत हालचाल करत असतो. काराकोरमपासून पूर्वेकडे आणि उत्तरेकडे मंगोलियातील अल्ताई पर्वतांपर्यंत त्याचा अधिवास असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठ परिसरात पक्षिनिरीक्षणाच्या सर्वेक्षणमध्ये पारवा, भारद्वाज, पाकोळी, टिटवी, लहान बगळा, ढोकरी, शिकाऱ्या, दलदल हरीण, घार, वेडा राघू, खंड्या, तांबट, पहाडी पोपट, लहान निखार, हळद्या, सुभग, नाचण, कोतवाल, स्वर्गीय नर्तक लांब शेपटीचा खाटीक, कावळा आणि त्यांच्या वैभवशाली शेपटीसह असंख्य मोर दिसले.