

Grape growers in crisis just in time for Diwali
देवळाली कॅम्प : सुधाकर गोडसे एप्रिल खरड छाटणीनंतर द्राक्षकाडीला एप्रिल ते जूनपर्यंत बागेला गर्भधारणेसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. मात्र भर उन्हाळ्यात ६ मे पासूनच बेमोसमी पाऊस सुरु झाला आणि तो मागील आठवड्यापर्यंत पावसाने उघडीप दिली नसल्यामुळे बागेला सूर्यप्रकाश न मिळाल्याने गर्भधारणेला अडचण आली आणि आता द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असून, शासनाने द्राक्ष बागायतदारांना आर्थिक संकटातून वाचवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सलग सहा महिने पाऊस सुरूच राहिल्यामुळे द्राक्षबागेची पाने लवकरच खराब झाली. काडीमध्ये गर्भधारणेची वेळ असताना नेमका पाऊस सुरू असल्यामुळे काडीला सूर्यप्रकाश मिळाला नाही. त्याचा परिणाम आता दिसत आहे. आता बागेची सप्टेंबर छाटणी सुरू असून बागा फुटल्या. पण काडीत गर्भधारणेअभावी छाटणीनंतर काही झाडांवर दोन ते चार घड दिसत आहेत, तर काही झाडांवर घडच दिसत नाहीत. हा परिणाम केवळ अवकाळी पावसाचा असून, यावर्षी हंगाम वाया जाण्याची चिन्हे आहेत. फवारणीसाठी भरमसाठ औषधांची गरज, खते व मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही आणि त्यात निसर्गदेखील साथ देत नाही, अशी स्थिती आहे.
यंदा बागा जरी आल्या नाही, तरी पुढील हंगामासाठी काडीसाठी फवारणी करावीच लागणार असल्याने शेतकऱ्यांचा खर्च हा सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी संपूर्ण कर्जाच्या बोजाखाली दबत चालला आहे. अवकाळी पाऊस आणि निसर्ग साथ देत नसताना वाढलेला खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील पीक कर्जाचा आकडा वाढतच आहे.
शेतकरी चहुबाजूने अडचणीत सापडला असल्याने कोणते पीक घ्यावे, हा पेच उभा आहे. कोणत्याच पिकाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. त्यामध्ये बागेचे पीक हे खर्चिक ठरले आहे. त्यामुळे शेतकरी द्राक्षबागा तोडण्याच्या मार्गावर आहेत.