

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
सटाणा नाका परिसरातील हिराई हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची सिझेरियन प्रसूती झाल्याच्या प्रकरणात पोलिस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे तिच्या सावत्र वडिलांसह आईला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली असून, एकूण ११ जणांविरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संरक्षण आणि आधार देण्याची जबाबदारी असलेल्या सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेने आपल्या जबाबात केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घडलेला प्रकार तिने आईला सांगितल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तिने नमूद केले आहे.
तसेच, हा प्रकार उघड केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही तिला देण्यात आल्याचा उल्लेख तिच्या जबाबात आहे. त्यामुळे भीतीच्या छायेत तिने ही बाब दीर्घकाळ गुप्त ठेवली. या प्रकरणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि ७ जून रोजी हिराई हॉस्पिटलमध्ये तिची सिझेरियन प्रसूती होऊन तिने कन्येला जन्म दिला.
प्रसूतीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाली. या प्रकरणातील इतर आरोपींच्या भूमिकेचाही तपास सुरू असून, संपूर्ण घटनाक्रमाचा सर्वंकष छडा लावण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. अल्पवयीन पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही बाब तपासातून वगळली जाणार नसल्याचेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले.
चार दिवसांची पोलिस कोठडी
घटनेची माहिती समोर येताच पीडितेची आई आणि सावत्र वडील फरार झाले होते. कॅम्प पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे चार दिवसांत हैदराबाद येथे दोघांचा माग काढण्यात आला. गुरुवारी (दि. ११) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.