Malegaon MIDC water supply shutdown
सिन्नर : येथील माळेगावऔद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा जलकुंभ दुरुस्तीसाठी ७ नोव्हेंबर सायंकाळी ६ पर्यंत ते 10 नोव्हेंबर सकाळी ७ पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उद्योजकांना येथील औद्योगिक एमआयडीसीने दिली आहे. त्यामुळे वसाहतीत एक हजार कारखान्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. वसाहतीला पाणीपुरवठा सुरू ठेवावा अथवा टँकरची सुविधा पुरवावी, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (सिमा) केली आहे.
'सिमा'चे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, विश्वस्त रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मारुती कुलकर्णी, शांताराम दारुंटे व इतर सर्व उद्योजकांनी ही मागणी केली आहे. जलकुंभाची दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. मात्र, तब्बल चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवताना उद्योजकांची होणारी अडचण विचारात घेतलेली नाही. यात प्रक्रिया उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तर कामगारांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी उद्योजकांना धावपळ करावी लागणार आहे.
वसाहतीने उद्योगांना पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करावे, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करावी. पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, अशी उपाययोजना हाती घेतल्यानंतरच पाणीपुरवठा बंद करावा. तोपर्यंत पाणीपुरवठा बंद करू नये, अशी मागणी 'सिमा'च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पाणी पुरवठा चार दिवस बंद राहणे हे उद्योगांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पाणी पुरवठा सुरु ठेवावा, अथवा टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी 'सिमा 'ने केली आहे.
पूर्णतः बंद नव्हे, कमी दाबाने पाणीपुरवठा : भोसले
जलकुंभ दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा पूर्णतः बंद करणार नाही, तर कमी दाबाने सुरु ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पाण्याचा दाब कमी केला जाईल. शनिवारी कारखान्यांना सुटी असते. त्यानंतर रविवारचा दिवस थोडीफार गैरसोय होऊ शकते, असे एमआयडीसी उपविभागीय अभियंता संदीप भोसले यांनी सांगितले.
पाणी पुरवठ्यासाठी टँकरची पर्यायी सुविधा देण्यात यावी. त्यानंतरच जलकुंभदुरुस्तीचे काम हाती घ्यावे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय होणार नाही.
बबन वाजे, सचिव, सिमा