

नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी भाजपने केली होती. उपनेते सुनील बागुल हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व आरोप धुऊन काढले गेले. पैसा आणि बळाचे राज्य! आणखी काय?", असा सवालही त्यांनी केला. यानंतर आता तूर्तास बागुल यांचा भाजप प्रवेशाला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "भाजपची जादू अतुलनीय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला ती आवडत नाही. नाशिकच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे पोलिस खटले दाखल झाले, अटक टाळण्यासाठी ते फरार झाले आणि अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिसांनी त्यांच्यावर 'मोक्का'लावण्याची योजना आखल्याची बातमी आली. कमालमत्ता? हे 'फरार' आज भाजपमध्ये सामील होत आहेत! भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व आरोप धुऊन काढले गेले. पैसा आणि बळाचे राज्य! आणखी काय?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यावर दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता, तसेच उपनेते सुनील बागुल यांच्यावरही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणांमुळे भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज (दि. ३ जुलै) सकाळी १०:३० वाजता ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्यासह ४ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली हाेती. शिवसेनेतील एक अनुभवी नेते अशी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांची ओळख आहे. त्यांचा भाजप प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात हाेता. बागुल यांच्यासोबत त्यांचे पुत्र सुनील बागुल, तसेच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आणि माजी नगरसेवक कमलेश बोडके हे देखील भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा हाेती.
सुनील बागुल यांच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात हाेते.