

सिडको (नाशिक) : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशुविहार ही शाळा शंभर टक्के अनुदानित असूनही पालकांकडून जादा फी वसुलीप्रकरणी शिक्षक-पालक मेळाव्यात पालक आणि संस्था पदाधिकारी यांच्यात वाद झाल्याने उपस्थित पालकांनी थेट अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांना निवेदन दिले. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पालक-शिक्षक मेळाव्याला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उत्तमनगर येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेची अभिनव बाल विकास मंदिर मार्ग ही शाळा १०० टक्के अनुदानित असूनही विद्यार्थ्यांकडून शाळेने १५०० रुपयांची केलेली फी वाढ बेकायदेशीर असल्याचा दावा पालकांनी केला आहे. शाळा दरवर्षी पालकांकडून विमा पॉलिसीचे नावाने २०० रुपये घेते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शाळेने मुलांचा विमाच काढलेला नाही. विम्याच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या संदर्भामध्ये गेल्या दोन वर्षांपासून पालकांनी शिक्षणमंत्री, शिक्षण प्रधान सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, आयुक्त जिल्हाधिकारी, प्रशासनाधिकारी आदींना निवेदन दिली आहेत. गत महिन्यात शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीच्या अहवालामध्ये शाळा १०० टक्के अनुदानित असेल तर मुलांकडून कुठलीही फी घेता येणार नाही. तसेच घेण्यात आलेली साडेसात हजार रुपये फी पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. शाळेविरोधात येत्या 27 जूनला मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले.
अभिनव शाळेत पालक-शिक्षक मेळाव्यात पालक महेश पाटील यांनी शाळेवर केलेले आरोप चुकीचे आहेत, हे पालकांना आम्ही सांगितले आणि पालकांना खरी स्थिती समजली. आमदार सीमा हिरे यांच्यासह सभेला सुमारे अडीच हजार पालक उपस्थित होते. सर्व पालक आमच्या बाजूने होते. फक्त आरोप करणारे महेश पाटील यांच्या बाजूने फक्त तीन पालक आहेत. महेश पाटील याच्या मुलाचा दाखला देण्याचा ठराव सभेत पालकांनी मंजूर केला.
ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक