

ठळक मुद्दे
'स्मार्ट मीटरमुळे वीज स्वस्त होईल' असा महावितरणचा दावा दिशाभूल करणारा
साध्या मीटरने 10 तासांत 219 युनिट वीज, तर त्याच उपकरणांनी स्मार्ट मीटरने 479 युनिट
पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना ३ ते ५ पटीने बिल
नाशिक रोड : महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या घरातील जुने मीटर काढून 'स्मार्ट मीटर' बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या नव्या मीटरमुळे वीजबिल तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी वाढेल, असा ग्राहक संघटनांचा दावा आहे. 'स्मार्ट मीटरमुळे वीज स्वस्त होईल' असा महावितरणचा दावा दिशाभूल करणारा असल्याचेही संघटनांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात स्मार्ट मीटरविरोधात नाराजी व्यक्त केली जात असली तरी महावितरणचे कर्मचारी चोरून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत असल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात साध्या मीटरने १० तासांत २१९ युनिट वीज दाखविली, तर त्याच उपकरणांनी स्मार्ट मीटरने ४७९ युनिट दाखविले. त्यामुळे या मीटरची गती ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना ३ ते ५ पट जास्त बिल आल्याचे समोर आले आहे. ७००-८०० रुपयांच्या बिलाऐवजी थेट ३५०० रुपये आकारल्याच्या तक्रारी होत आहेत. याशिवाय बिलामध्ये अतिरिक्त डिपॉझिट घेण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
उत्तर प्रदेशात १.६ लाख स्मार्ट प्रीपेड मीटर निकामी ठरलेत. गुजरात, राजस्थान व ओडिशात ग्राहकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प थांबविण्यात आला. तामिळनाडू, पश्चिम बंगाल व बिहारमध्येही रोष वाढला असून महाराष्ट्रात ग्राहक व वीज कामगारांकडून तीव्र आंदोलन सुरू असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने दिली आहे.
वीज कायदा २००३ व ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार प्रत्येकाला स्वतःचे मीटर बसविण्याचा हक्क आहे. त्यामुळे ग्राहकांनी महावितरणकडे लेखी अर्ज करून हा हक्क वापरावा, असे आवाहन नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, विलास देवळे, ॲड. मयूर देशपांडे व अनिल नांदोडे यांनी केले आहे.