

नाशिक : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा तिसरा व अंतिम लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने १० जून २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षीस दिले जाणार आहे.
दि. ७ एप्रिल व दि. ७ मे रोजीच्या पहिल्या व दुसऱ्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या सर्व लघुदाब वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी-लाइव्ह) वीज ग्राहकांसाठी लागू आहे. ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत.
ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीजबिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाइल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते. परिणामी, सध्या राज्यात ७० टक्केहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.