

मालेगाव (नाशिक ): महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित महिलारत्न पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्ञानदा चेतन निकम हिची 19 वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. दि. 11 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान बडोदा, गुजरात येथे स्पर्धा होणार आहे.
ज्ञानदा ही प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत असून, तिची तिसर्यांदा महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ज्ञानदाने यापूर्वी 2022-23, 2023-24 मध्ये 19 वर्षाखालील महाराष्ट्र महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने सहावीत असताना क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तिची आई दीपा निकम, वडील चेतन निकम हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या लेकीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची मनापासून परवानगी दिली आणि तिने संधीचे सोने केले. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थेच्या एलव्हीएच शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण तिने नामपूर महाविद्यालयातून पूर्ण केले.
सध्या ती महिला महाविद्यालय मालेगाव येथे शिकत आहे. दाभाडीची ही लेक असून, तिने मालेगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ज्ञानदा गत 7 वर्षांपासून शहरातील प्रसिद्ध अस्पायर क्लब येथे तन्वीर शेख यांच्याकडे सराव करत असून, अरुण भोसले यांचेही तिला सहकार्य लाभले आहे. ज्ञानदाच्या या यशाबद्दल तिच्यावर शहर व तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस प्रशांत हिरे, समन्वयक अपूर्व हिरे, युवा नेते अद्वय हिरे, महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा संपदा हिरे, प्राचार्या रजनी पाटील अभिनंदन यांनी तिचे केले आहे. ज्ञानदाला क्रीडासंचालिका प्रा. सुरेखा दप्तरे यांचे मार्गदर्शन लाभले.
ज्ञानदा ही ‘डब्ल्यूएमपीएल’मध्ये रत्नागिरी जेट संघात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्रच्या गटात गोवा, पुद्दूचेरी, तमिळनाडू या संघांचा समावेश आहे. या स्पर्धा साखळी पद्धतीने होणार असून, यातून संघ पात्र झाल्यास बाद फेरीच्या स्पर्धा पुण्यात होणार आहेत.