

खेडगाव : यावर्षी पर्जन्यमानाने सरासरीचा टप्पा गाठल्याने सगळीकडेच भरपूर पाणीच पाणी, अनुकूल हवामानामुळे गहू तसेच हरभऱ्याचे बंपर पीक येण्याची शक्यता आहे. यंदा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे टोमॅटो या नगदी पिकाचे उत्पादन घेतले होते. टोमॅटोसाठी अवाढव्य खर्च करूनही यावर्षी टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकरी निराश झाले होते, टोमॅटोवर झालेला खर्चही भरून निघाला नव्हता.
अनेक प्रकारच्या महागड्या पावडर व लिक्विड खते तसेच रासायनिक खते वापरूनही काहीच फायदा झाला नव्हता. टोमॅटोसाठी वापरलेल्या खतांचा पुढील पिकांस फायदा होतो या उद्देशाने शेतकऱ्यांनी यावर्षी गव्हाचा पेरा केला आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये 7,800 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तर 1,870 हेक्टरवर हरभरा या पिकाची पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, सहायक कृषी अधिकारी मनीषा सावंत यांनी दिली.
यावर्षी टोमॅटो पिकास भाव नव्हता त्याचबरोबर भाजीपाला पिकांसही भाव नाही. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे असंख्य द्राक्षबागा तुटल्यामुळे व पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे गव्हाचे सगळीकडेच बंपर पीक येण्याची शक्यता आहे. साधारणपणे गव्हास सात ते आठ वेळेस पाणी भरावे लागते. हरभरा या पिकास थोडे पाणी कमी असलेतरी चालते. पण थंडी आवश्यक असते.
उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण यावर्षी सर्वाधिक असल्याने त्याचा फायदा गहू व हरभरा पिकास होईल. धान्य व्यवस्थित वाळवून व सुरक्षित ठेवल्यास ते जास्त दिवस टिकते व गरज पडल्यास बाजारात केव्हाही विक्रीस नेता येते. यामुळे धान्य पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.