

माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल
अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट
दुसर्यांदा मंत्रीपद धोक्यात असल्याची राजकीत वर्तुळात चर्चा
Manikrao Kokate news
नाशिक : जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे. आज दिवसभरात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुमारे ३० वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीपद मिळाले होते. यानंतर वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत राहिले. यानंतर विधानसभेत त्यांच्यावर मी खेळत असल्याचा आरोप झाला. यानंतर त्यांना कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांच्याकडे राज्याचे क्रीडा मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणी त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रीपदासह आमदारकीही धोक्यात आली आहे. आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांची सदनिका घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आज माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.