

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात येणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अर्जासाठी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वारंवार जाण्याची तसेच कागदपत्रांच्या प्रिंट काढून प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
या प्रक्रियेसाठी शासनाने 'कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टिम' (सीसीव्हीआयएस) ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या तांत्रिक मदतीने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.
या माध्यमातून अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची सद्यःस्थिती तपासणे आणि प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. अर्जासोबत आवश्यक मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
जात नोंदीसाठी तसेच निर्धारित कालावधीपूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येणार आहे. आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू शकते.
जात पडताळणी समितीने शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्जात त्रुटी असल्यास एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे अर्जदाराला कळविण्यात येईल. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पुढील दोन महिने संधी दिली जाणार आहे. पाचव्या महिन्यात अंतिम ऑनलाइन सुनावणीची संधी देण्यात येईल. त्यानंतरही अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित प्रकरण निकाली काढण्यात येईल. अर्जदाराला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित चॅटबॉटद्वारे मार्गदर्शन आणि प्रश्नांचे निराकरण करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. तसेच मंजूर जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात येणार आहे.
नव्या ऑनलाइन प्रणालीच्या अनुषंगाने सेवा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक हजार रुपये, सेवाविषयक प्रयोजनासाठी एक हजार रुपये, तर शासकीय योजनांचा लाभ किंवा सवलतींसाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्जदाराने आधार क्रमांकाशी जोडलेल्या प्रणालीतून एकच अर्ज दाखल करता येणार असल्याने अर्ज भरताना आणि कागदपत्रे अपलोड करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील लिपिकाकडून अर्ज आणि कागदपत्रांची तांत्रिक तपासणी केली जाईल. त्यानंतर सदस्य सचिव अर्जाची छाननी करून पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही करतील. जात आणि रहिवासाचा दावा सिद्ध झाल्यास अर्ज वैधतेसाठी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांकडे पाठविण्यात येईल.
सर्व सदस्यांच्या निर्णयानंतर उपायुक्त डिजिटल स्वाक्षरीने जात वैधता प्रमाणपत्र जारी करतील. काही प्रकरणांत कागदपत्रांची संबंधित आस्थापनांकडून पडताळणी किंवा दक्षता पथकाकडून चौकशी केली जाऊ शकते. सुनावणी आवश्यक असल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाईल.