

Maharashtra is the first choice of foreign tourists!
उद्योग, शिक्षण, विकासात अग्रणी असलेल्या महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. २०२४ मध्ये सुमारे ३७ लाख पर्यटकांनी राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत महाराष्ट्रच पर्यटनासाठी आग्रेसर असल्याची एक प्रकारे मोहर उमटवली आहे. २०२३ पेक्षा ही संख्या चार लाखांहून अधिक असल्याचे केंद्रीय पर्यटन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल राज्यसभेत माहिती दिली. त्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, चित्रपटनिर्मिती आदी प्रगतीचे आलेख गाठतानाच विदेशी पर्यटकांचे आवडते 'हॉट डेस्टिनेशन' महाराष्ट्रच असल्याचेही अधोरेखित झाले. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ३३ लाख ८७ हजार परदेशी पर्यटकांनी भेट दिली. हीच संख्या २०२४ मध्ये वाढून ३७ लाख ५ हजार १७० इतकी विक्रमी झाली झाले. केवळ बर्फाच्छादित शिखरे सोडली,
तर महाराष्ट्रात पर्यटनासाठी बहुविध पर्याय आणि वैविध्य उपलब्ध आहे. जंगल सफारी, जागतिक वारसा असलेल्या प्राचीन लेण्या, निळाशार समुद्र, रूपेरी वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटन, थंड हवेची ठिकाणे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या आणि युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा म्हणून समाविष्ट गड-किल्ल्यांसह पर्यटन विभागाकडून बॅण्डिंग होत असलेले हेमलकसा, भामरागड सारखी सामाजिक पर्यटनस्थळे इतके बहुविध पर्याय अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने विदेशी पर्यटकांनी देशात महाराष्ट्रातील स्थळांवर पसंतीची मोहर उमटवली आहे.