

नाशिकरोड : जयभवानी रोडवर लवटेनगर-2 परिसरात रविवारी (दि. 7) सायंकाळी बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरातील नागरिक व शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी सायंकाळी 7.30च्या सुमारास सुमन हॉस्पिटलमागे, लवटे डेअरी फार्मशेजारी म्हशींसाठी बांधलेल्या हौदावर बिबट्या पाणी पिताना एका महिलेने पाहिले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या आपल्या पिल्लासह तेथून पळाला. आणि मनपा उद्यानाच्या भिंतीवरून उडी मारून निघून गेला.
परिसरातील नागरिक आणि शेतकर्यांनी त्याचा शोध घेतला असता लोणकर मळा येथून बिबट्या जात असल्याचे काही महिलांनी पाहिले. काही वेळानंतर तो विलास थोरात यांच्या घराजवळही दिसला. नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. वन अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी करत बिबट्याच्या पायांचे ठसे तपासून पाहिले. हा भाग आर्टिलरी सेंटरच्या परिसराशी जोडलेला आहे. या ठिकाणी पिंजरा लावण्याचे नियोजन झाले आहे.
देवळाली कॅम्प : आठ दिवसांपासून लोहशिंगवे परिसरात धुमाकूळ घालणारा व रविवारी गायीचा फडशा पाडणारा बिबट्या सोमवारी (दि. 8) सकाळी पाटोळे मळ्यातील पिंजर्यात जेरबंद झाला. मात्र या बिबट्यासोबत मादीही असून तिलाही जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
लोहशिंगवे, वंजारवाडी परिसरात बिबट्याचा गेल्या दोन महिन्यांपासून मुक्त संचार असून, त्याने अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला. गेल्या आठवडाभरात या बिबट्याने लोहशिंगवेत आठ ते दहा कुत्रे, तसेच काही वासरांची शिकार केली. रविवारी श्याम जैन यांच्या गोठ्यातील गायीवर हल्ला करत तिला ठार केले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळनंतर रस्त्यावर फिरणेदेखील मुश्किल झालेले आहे.
सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास सयाजी पाटोळे यांच्या मळ्यात पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला. त्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील रहिवाशांनी पिंजर्याकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती देताच वन अधिकारी अनिल अहिरराव, कर्मचारी जयनाथ गोंठे, पांडुरंग भांगरे, अशोक खानझोडे यांनी घटनास्थळी येत बिबट्यासह पिंजरा नासिकला नेला.
नानेगावला भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला बिबट्या
देवळाली कॅम्प : नानेगाव येथे सोमवारी (दि. 8) दुपारी भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट विहिरीत पडला. ही विहीर नाशिक साखर कारखान्याच्या परिसरात आहे. बिबट्याला बाहेर पडता न आल्याने विहिरीतील लाकडी फळीवर त्याने ठाण मांडले. त्याच्या डरकाळ्यांनी कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य काळू अडके यांना ही घटना सांगताच अडके यांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे पथक बिबट्याला सकाळी रेस्क्यू करणार आहे. परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी वनविभागाचे पथक विहिरीजवळ तैनात करण्यात आले आहे.
हा परिसर आर्टिलरी सेंटरजवळ असल्याने या ठिकाणी बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. वनविभागाने येथे पिंजर्यांची संख्या वाढवावी व या परिसरातील बिबट्यांना पकडून नागरिकांची दहशतीतून सुटका करावी.
विक्रम कदम, शिवसेना उपमहानगरप्रमुख
आर्टिलरी सेंटरच्या बाहेर दोन आणि आतमध्ये दोन असे चार पिंजरे ठेवले आहेत. सध्या पाऊस चालू असल्याने पिंजर्यांची जागा बदलण्यास अडचण आहे. उद्या पिंजर्यांची योग्य जागा बदलण्यात येईल.
अनिल अहिरराव, वन अधिकारी
धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद झाला असला तरी त्याच्यासोबतची मादी अद्याप मुक्त आहे. आता नर बिबट्या अडकल्याने मादी एकटीच राहिलेली आहे. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकते. वनविभागाने ड्रोनच्या साह्याने तिचा तातडीने शोध घेऊन जेरबंद करावे.
युवराज जुंद्रे, लोहशिंगवे ग्रामपंचायत सदस्य