Government Hospital Star Rating |राज्यात शासकीय रुग्णालयांना मिळणार आता 'स्टार रेटिंग'..!

रुग्णांना मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेच्या आधारे होणार सार्वजनिक क्रमवारी
Government Hospital Star Rating
Government Hospital Star Rating
Published on
Updated on

नाशिक : राज्यातील रुग्णालयांमधील शासकीय आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि रुग्णकेंद्रित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांसाठी 'स्टार रेटिंग प्रणाली' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक रुग्णालयाला त्यांच्या सेवा, सुविधा आणि कामगिरीच्या आधारे शून्य ते पाच स्टारपर्यंत सार्वजनिक दर्जाकन दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे शासकीय रुग्णालयांची गुणवत्ता नागरिकांसमोर पारदर्शकपणे येणार असून, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयाची निवड करताना अधिक विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये दर्जेदार सेवा देण्यासाठी सकारात्मक स्पर्धाही निर्माण होईल. रुग्णालयांचे मूल्यांकन १० महत्त्वाच्या निकषांवर केले जाणार आहे. यामध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, विशेष उपचार सेवा, आवश्यक औषधांची उपलब्धता, प्रयोगशाळा व एक्स-रे, ईसीजीसारख्या निदान सेवा, ओपीडी व खाटांचा वापर, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, रुग्ण सुविधा तसेच नागरिकांचा अभिप्राय या बाबींचा समावेश आहे.

Government Hospital Star Rating
Bairagi's Social Awareness Campaigns |देशभरात भारुडाची पताका फडकविणारे बैरागी

प्रत्येक निकष पूर्ण केल्यास अर्धा स्टार मिळेल आणि सर्व १० निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला पाच स्टार मिळतील. दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यांत रुग्णालयांचे मूल्यांकन करून स्टार रेटिंग जाहीर केले जाईल. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध आकडेवारीच्या आधारे हे मूल्यमापन होणार असून, प्रत्येक रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रानुसार स्वतंत्र निकष लागू केले जातील. स्टार रेटिंग प्रणालीमुळे रुग्णालयांचा दर्जा सार्वजनिक होईल, रुग्णांचा विश्वास वाढेल आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासनावर सातत्याने जबाबदारी राहील, अशी अपेक्षा आहे

६२३ रुग्णालयांचा होणार समावेश

या प्रणालीत राज्यातील ६२३ शासकीय रुग्णालयांचा समावेश केला आहे. यात २ संदर्भ सेवा रुग्णालये, २० जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, २४ स्त्री रुग्णालये, १०६ उपजिल्हा रुग्णालये, ३७३ ग्रामीण रुग्णालये, ७८ ट्रॉमा केअर सेंटर आणि १२ राज्य कामगार विमा रुग्णालयांचा समावेश आहे.

Government Hospital Star Rating
Robotic Surgery for Dual Cancer | ७८ वर्षीय वृद्धाची दोन कर्करोगांवर यशस्वी मात

स्टार रेटिंगचे १० प्रमुख निकष

विशेष उपचार सेवा उपलब्धता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आवश्यक औषधांचा साठा, निदान चाचण्यांची उपलब्धता, ओपीडी कार्यक्षमता, खाटांचा वापर, प्रसूती सेवा, मोठ्या शस्त्रक्रिया, स्वच्छता व रुग्ण सुविधा, रुग्णांचा अभिप्राय.

४ हून अधिक स्टार मिळविणाऱ्यांचा विशेष गौरव

चार किंवा त्याहून अधिक स्टार मिळविणाऱ्या रुग्णालयांना शासनाकडून विशेष गौरव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ दर्जाकनच नव्हे, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रोत्साहन मिळणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news