

नाशिक : उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या अर्ज छाननीत विरोधी पॅनलमधील अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने, उत्तर महाराष्ट्रातून ४० पेक्षा अधिक उमेदवारांनी तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली आहे. याठिकाणी दाद न मिळाल्यास, उच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी विरोधी पॅनलने सुरू केली आहे.
गेल्या २५ व २६ मे रोजी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत विरोधी पॅनलच्या उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाले. कारकुनी तसेच तांत्रिक चुकांमुळे अर्ज बाद केले गेले. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या विरोधी उत्तर महाराष्ट्र विकास पॅनलचे संजय सोनवणे व शेठ वालचंद, हिराचंद प्रगती पॅनलचे कांतीलाल चोपडा यांचे प्रत्येकी चार व दोन अर्ज बाद झाले. तसेच नाशिकमधून गव्हर्निंग कौन्सिलसाठी दाखल ४० उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
याशिवाय धुळे, जळगावसह इतर जिल्ह्यांमधील उमेदवारांचे देखील अर्ज बाद झाल्याने, बुधवारी (दि. २७) या सर्व उमेदवारांनी महाराष्ट्र चेंबरचे मुंबई येथील मुख्यालय गाठत, तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली. तसेच अर्ज सादर करीत, छाननी समितीचा निर्णय अमान्य असल्याचे सुचविले. यात नाशिकमधून उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांसह गव्हर्निंग कौन्सिलच्या तब्बल ४० पेक्षा अधिक उमेदवारांनी तक्रार निवारण समितीकडे अर्ज सादर केले आहेत.
संस्थेच्या घटनेनुसार, तीन दिवसांत अर्जावर निर्णय देणे तक्रार निवारण समितीला बंधनकारक आहे. त्यामुळे आता समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, अर्ज छाननी समिती, तक्रार निवारण समितीच्या चेअरमनपदी सत्ताधारीच असल्याने या समित्यांकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचे सांगत, विरोधी पॅनलकडून उच्व न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे.
शतकमहोत्सव साजरा करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर या प्रतिष्ठित संस्थेचा राज्यभर लौकिक आहे. मात्र, आताच्या सत्ताधाऱ्यांनी हा लौकिक धुळीस मिळविला आहे. लोकशाहीची हत्या करीत, संस्थेत हुकुमशाही कारभार सुरू आहे. विरोधी गट नसावा, या भावनेतून सत्ताधारी गट अत्यंत चुकीचे राजकारण करीत आहे. सत्ताधाऱ्यांचे हे कारनामे संबंध महाराष्ट्र बघत असून, सभासदच त्यांना आता धडा शिकवतील.
- सचिन जाधव, सभासद, महाराष्ट्र चेंबर
संस्थेत निवडणूक होऊ नये, या मताचा मी आहे. मात्र, काही मंडळी संस्थेचे घटक नसतानाही इतर सभासदांचे माथी भडकवत आहेत. मी सर्वांशी संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या सभासदांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहे त्यांना वेगवेगळ्या समित्यांत सामावून घेण्याचा माझा विचार आहे. प्रत्येकाकडून संस्थेच्या हिताचा विचार अपेक्षित आहे.
- रवींद्र माणगावे, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर
मतदारयादीतही छेडछाड
सत्ताधाऱ्यांनी मतदार यादीतही छेडछाड केल्याचा आरोप विरोधी पॅनलकडून करण्यात आला आहे. शांत आणि संगनमताने सत्ताधारी विरोधकांना निवडणूक प्रक्रियेतून बाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही हुकूमशाही वृत्ती असून, निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार विरोधी पॅनलच्या प्रमुखांकडून करण्यात आला आहे.