Menstrual hygiene day| ग्रामीण भागात आरोग्य अजूनही उपेक्षितच

मासिक पाळी दिन विशेष : स्त्रीत्वातील मातृत्वाचा उत्सव की 'त्या' पाच दिवसांचा संघर्ष
Menstrual hygiene day
Menstrual Hygiene Day
Published on
Updated on

नाशिक : अंजली राऊत

स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा खरा निसर्गदत्त सोहळा म्हणजेच मासिक पाळी होय. मासिक पाळीकडे केवळ एक शारीरिक बदल म्हणून न पाहता, ती मानवी जीवनाची निर्मिती करणारी एक पवित्र प्रक्रिया आहे, हा संदेश प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनस्तरापासून काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. पाळीबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे. तर जाणून घेऊया या दिवसाबद्दल शहरासह ग्रामीण महिलांचे काय म्हणणे आहे.

या दिवसाची सुरुवात पहिल्यांदा २०१४ मध्ये झाली. जी वॉश युनायटेड या ना नफा ना तोटा तत्त्वावर संस्थेने सुरू केली होती. मासिक पाळीच्या काळात थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. २८ तारखेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यामागे एक विशेष महत्त्व आहे. खरंतर बहुतेक महिला आणि मुलींना दर महिन्याला ५ दिवसांकरिता मासिक पाळी येते आणि मासिक पाळीच्या चक्राचा कालावधी हा साधारण २८ दिवसांचा असतो. म्हणूनच दरवर्षी मे महिन्याच्या २८ तारखेला हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने, ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचा हा संघर्ष अत्यंत वेदनादायी आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे. १२ ते १४ तास शेतात आणि घरात न थकता रावणाऱ्या या महिला खऱ्या अर्थानि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, पण दुर्दैवाने त्यांचेच आरोग्य नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे. तर दुसरीकडे मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या शारीरिक त्रासामुळे नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी मासिक पाळी रजेची सुविधा हवी आहे.

ग्रामीण भागात मासिक पाळीबद्दल मौन आणि संकोच बाळगत उघडपणे न बोलण्याच्या सामाजिक बंधनांमुळे महिला स्वतःचे दुखणे मनातच दाबून ठेवतात. पोटदुखी, कंबरदुखी आणि शारीरिक थकवा असतानाही विश्रांती न घेता शेतातील कष्टाची अतिश्रमाची कामे करावी लागतात. तसेच शेतात काम करताना स्वच्छ स्वच्छतागृहे आणि पाण्याच्या अभावामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची संभाव्य शक्यता असते. ?

आजच्या जीवन शैलीमुळे अवघ्या १० ते १२ क्योगटात सुद्धा पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीररचना आणि मानसिकदृष्ट्या अशा मुली पूर्णपणे सक्षम नसतात. त्यामुळे पाळीत स्वच्छता जागरुकतेबाबत त्या अनभिज्ञ असतात. दर सहा ते आठ तासांनंतर पेंड अथवा कपडा बदलणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून संसर्ग होणार नाही. विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत स्वच्छतागृहाचा अभाव दिसून येतो. शाळेत मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

- प्रीती लुंकड, स्त्रीरोगतज्ज्ञ

ग्रामीण भागातील महिलांकरिता मासिक पाळी

स्वच्छता या विषयावर काम करत आहे. मासिक पाळी ही लाज किंवा त्याबद्दल लपवून ठेवण्याचा विषय नसून आरोग्य आणि सन्मानाशी जोडलेला नैसर्गिक विषय आहे. समाजातील गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.

- संगीता बालोडे, संस्थापक, निर्णय फाउंडेशन

बऱ्याच महिला या नोकरीनिमित्त प्रवास करतात, आपल्याकडे अजून आपण मासिक पाळी या विषयावर संकोचितपणेच बोलतो. त्यामुळे किमान दोन किंवा एक दिवस तरी मासिक पाळी रजा पाहिजेच, जेणेकरून महिलांना आराम मिळू शकेल.

- निलांबरी चौधरी, नोकरदार महिला, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध खेड्यापाड्यांसह शिरसगाव, नाचलोंढे, वाघेरपाडा, जातेगाव, हरसूल, चिंचवड, सारस्ते, नाकेपाडा, खोरीपाडा येथील गावांमध्ये पॅड वाटप करून महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देऊन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात आणि उपाययोजना सुचवल्या जातात.

- पूजा महेंद्र गायकवाड, चिंचवड, त्र्यंबकेश्वर, स्वयंसेवी संस्था

महिलांना मासिक पाळीमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मूड स्विंग्जसुद्धा होत असतात. त्या दिवसांत कोणाला खूप त्रास होतो. त्यामुळे मासिक पाळी रजा ही प्रत्येक महिलेच्या गरजेनुसार द्यावी.

- अश्विनी भालेराव, नाशिकरोड

मासिक पाळीतील पहिले दोन दिवस हे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अतिशय त्रासदायक असतात. त्या दिवसात प्रत्येक महिलेला आराम अत्यावश्यक असतो आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना समजून घेण्याची गरज असते. कमीत कमी पिरियड लिव्ह मिळाली तर काम सोवीनुसार करता येईल.

- कविता निंबोरकर, नोकरदार महिला, शिखरेवाडी

ग्रामीण भागात अजूनही याबाबत गैरसमज आणि संकोच आहे. त्यामुळे जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. आमची स्वयंसेवी संस्था गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये जागृती निर्माण करत आहे.

- जिजाताई निंबारे, स्वयंसेवी संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news