

सटाणा : पुढारी वृत्तसेवा
बाजारकात गव्हाचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असताना, 'महाबीज'कडून गहू बीजोत्पादकांना मात्र प्रतिक्विंटल अवघे २ हजार ९६३ रुपये दिले जात आहेत. बाजारभाव आणि महाबीजच्या दरातील मोठ्या तफावतीमुळे बीजोत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप ब्राह्मणगाव येथील गहू बीजोत्पादक जयंत जोशी यांनी केला.
महाबीजच्या नवीन दर धोरणाचा फेरविचार करून बाजारभावाशी सुसंगत दर द्यावेत, अशी मागणी त्यांनी व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
महाबीजने २०२३-२४ पासून बीजोत्पादकांना दर देण्याच्या धोरणात बदल केला आहे. मात्र, या बदलाची पुरेशी माहिती उत्पादकांना नसल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.
पूर्वीच्या जिल्हाणहाय दर धोरणानुसार गव्हाला प्रतिक्विंटल ३ हजार ३५१ रुपये मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २ हजार ९६३ रुपयेच मिळाल्याने प्रतिक्विंटल ३८८ रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. महाबीजकडून पैसे मिळालेल्या दिवशी बाजारात गव्हाचा सर्वोच्च दर प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये होता.
सध्याचे बाजारभावही अधिक असल्याचे जोशी यांनी नमूद केले आहे. त्यामुळे बाजारतातील दर आणि महाबीजकडून दिला जाणारा दर यांचा ताळमेळ कसा साधला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरातील तफावत स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सटाणा, मालेगाव आणि कळवण कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून गव्हाच्या बाजारभावाची अधिकृत माहितीही मिळवली आहे.
सटाणा बाजार समितीकडून एप्रिल २०२६, तर मालेगाव बाजार समितीकडून सप्टेंबर २०२६ मधील बाजारभावाची माहिती घेण्यात आली. कळवण बाजार समितीकडूनही गव्हाची आवक व बाजारभावाचा तपशील उपलब्ध करून घेण्यात आला आहे.
बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना मेहनत, आर्थिक गुंतवणूक आणि जोखिम घ्यावी लागते. असे असताना बाजारभावापेक्षा कमी दर मिळत असल्यास शेतकरी बीजोत्पादकडे वळण्यास निरुत्साही होतील, अशी चिंता जोशी यांनी व्यक्त केली.
महाबीज प्रशासनाने दर धोरणाचा फेरविचार करून बाजारभावाशी सुसंगत दर निश्चित करावेत आणि उत्पादकांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.