

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपविरोधात महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला खरा. मात्र, अनेक ठिकाणी आघाडीतील दोन्ही पक्षांनी उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने तब्बल ८ प्रभागांमध्ये आघाडीतील उमेदवारांमध्ये थेट सामना रंगणार आहे. जागांवरून एकमत न झाल्याने या प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे अपक्षांना सोबत घेत पॅनलनिर्मितीचे नियोजन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आघाडीतील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले गेले आहे.
जागावाटपापासूनच महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्यात मतभेद होते. मात्र, भाजपला रोखण्यासाठी आघाडीने एकत्रित निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र उबाठा-मनसेने आपापसांतील जागावाटप पूर्ण करून घेत उर्वरित जागा दोन्ही काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव ठेवला. हाच प्रस्ताव वादाचा मुद्दा ठरला. त्यामुळे अखेरपर्यंत जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही.
आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे दोन दिवसांपासून सत्र सुरू होते. बैठकामध्ये अगदी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत पेच कायम राहिला. विशेषतः उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जागावाटपावरून एकमेकांचे उमेदवार पळवापळवीदेखील झाली. राष्ट्रवादीने (श.प) निश्चित केलेले उमेदवारांना उबाठा सेनेने उमेदवारी दिल्या. त्यामुळे माघारीच्या मुदतीतही राष्ट्रवादी (श.प) च्या उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले. परिणामी शहरातील ८ प्रभागांमध्ये आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
या प्रभागांमध्ये संभ्रम राष्ट्रवादीला (श.प.) १६ जागा देण्याचे मान्य करण्यात आले. असे असताना पक्षाने ३१ जागांवर उमेदवार दिले. परंतु राष्ट्रवादीला ज्या १६ जागा देण्यात आल्या त्यातीलही काही जागांवर उबाठाने एबी फॉर्म दिल्याने राष्ट्रवादीनेही उमेदवार कायम ठेवले. राष्ट्रवादी (श.प) च्या प्रभाग १९ अ मधील उमेदवार सरला लोखंडे आणि २२ ब च्या उमेदवार सीमा वाबळे या दोघांनी माघार घेतल्याने आता पक्षाचे २९ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र आता या २९ जागांवर पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे काही अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करून पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
या प्रभागांमध्ये गोंधळ
राष्ट्रवादी (श.प) आघाडीत १६ जागा देण्यात आल्या. यातील १० पैकी ६ जागांवर उबाठा आणि ४ जागांवर मनसेनेही उमेदवार दिले. प्रभाग १६ मध्ये पवार गटाकडून संकेत पगारे आणि प्रभाग ४ मधून महेश शेळके यांना पक्षाने एबी फॉर्म दिला असतानाही उबाठाने स्वतंत्र उमेदवारांचे पॅनल दिले. तसेच काँग्रेसला १२ जागा दिल्या असताना त्यापैकी काँग्रेसचे उमेदवार वंदना मनचंदा आणि गुलजार कोकणी यांना उबाठानेही एबी फॉर्म दिल्याने काँग्रेसला प्रत्यक्षात दहाच जागांवर समाधान मानावे लागले. प्रभाग १, २२, १९, २०, २६, ३० या प्रभागांमध्येही असाच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात काही ठिकाणी आघाडीचे पॅनल, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव उमेदवार असल्याची स्थिती आहे.