

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांचे नियमित मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पथक येत्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत आहे. हर्डीकर यांच्यामार्फत नाशिकचा दुसरा सर्वंकष वाहतूक आराखडा नाशिक महापालिकेसह राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.
या आराखड्यातून 'नियमित मेट्रो'च्या आगमनाचा मार्ग सुकर बनणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकमध्ये देशातील पहिली टायरबेस मेट्रो निओ सुरू करण्याचा सुरुवातीला प्रस्ताव होता. यासाठी पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिका देखील निश्चित करण्यात आल्या होत्या. सन २०२१च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २१०० कोटींची तरतूददेखील करण्यात आली होती.
परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीअभावी हा प्रकल्प रखडला. दरम्यान, नाशिकच्या झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील काही प्रमुख मार्गावर प्रतितास २० हजारांहून अधिक प्रवासी उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आल्याने मेट्रो निओऐवजी अधिक क्षमतेच्या नियमित मेट्रो किंवा लाइट मेट्रोचा विचार पुढे आला. यासंदर्भात नगरविकास विभागाचे अवर सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती.
या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रोच्या विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानुसार महामेट्रोचे तज्ज्ञ पथक नाशिकमध्ये येऊन संभाव्य मार्गाची पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून सर्वंकष वाहतूक आराखडा राज्य शासनाला तसेच नाशिक महापालिकेला सादर करण्याचे या बैठकीत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक येत्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
मेट्रो निओपासून नियमित मेट्रोकडे प्रवास
नाशिकसाठी सन २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानंतर सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायरबेस्ड मेट्रो निओची घोषणा केली होती. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत त्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, वाढती प्रवासी संख्या आणि बदलत्या वाहतूक गरजांमुळे आता मेट्रो निओचा पर्याय मागे पडला. आतानियमित मेट्रो किंवा लाइट मेट्रोच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत.