Nashik Regular Metro Trial | नाशिकमध्ये नियमित मेट्रोची चाचपणी

Nashik Regular Metro Trial | नाशिकमध्ये नियमित मेट्रोची चाचपणी
Metro
MetroPudhari
Published on
Updated on

नाशिक : नाशिकसाठी प्रस्तावित टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्प आता जवळपास मागे पडण्याच्या स्थितीत असून, त्याऐवजी मुंबई-पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर नियमित मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या वाढत्या गरजा आणि प्रतितास प्रवासी संख्येचा आवश्यक निकष पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आल्याने नियमित मेट्रोच्या पर्यायाला बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाचे अवर सचिव अजयसिंह पाटील यांनी बुधवारी (दि.१०) मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक बोलावली असून, या बैठकीत नियमित मेट्रो प्रकल्पाच्या शक्यतांवर चर्चा होणार आहे. यासंदर्भातील पत्र महापालिका तसेच संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आले आहे.

Metro
AI and Automation Jobs Impact | एआय अन् ऑटोमेशनमुळे पारंपरिक नोकऱ्यांना धोका

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नाशिक महापालिकेने २०१६ मध्ये शहराचा पहिला सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. दिल्लीस्थित 'अर्बन मास ट्रान्झिट कंपनी' ने तयार केलेल्या या आराखड्यात पादचारी सुविधा, सायकल ट्रॅक, रस्ते विकास, मालवाहतूक व्यवस्था आणि आधुनिक वाहतूक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला होता. याच आराखड्याच्या आधारे पुढे सिटीलिंक बससेवा सुरू झाली आणि नाशिकसाठी टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे २,१०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र गेल्या आठ वर्षांपासून प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागलेला नसल्याने आता नियमित मेट्रोचा पर्याय गांभीर्याने विचारात घेतला जात आहे.

Metro
Ashok Kharat court statement |"आता मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढंच मला माहिती!"; अशोक खरात पहिल्यांदाच कोर्टात बोलला

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) टायरबेस्ड मेट्रोऐवजी नियमित मेट्रोच्या दृष्टीने नाशिकचा वाहतूक आराखडा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तयार करण्यात आलेला आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडे सादर करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासात नाशिकमध्ये प्रतितास २० हजारांहून अधिक प्रवासी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे नियमित मेट्रोसाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा निकष पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

बैठकीस हे अधिकारी उपस्थित राहणार

बुधवारी होणाऱ्या ऑनलाइन बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत नियमित मेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यता, प्रवासी संख्या, संभाव्य मार्ग आणि आर्थिक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.

हा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला असून, त्यावर पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे टायरबेस्ड मेट्रो निओऐवजी नियमित मेट्रो प्रकल्पाला आता नव्याने गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मेट्रोसाठीचा निकष ठरला निर्णायक

सामान्यतः नियमित मेट्रो प्रकल्पासाठी प्रतितास किमान २० हजार प्रवासी आवश्यक मानले जातात. यापूर्वी नाशिकमध्ये हा आकडा सुमारे १४ हजार असल्याने टायरबेस्ड मेट्रो निओचा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news