

पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर 'पुणेरी मेट्रो' धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे काम ३ टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा जुलैपर्यंत पूर्ण होणार असून, या संपूर्ण मार्गावरील सर्व स्थानकांवर सेवा सुरू होण्यास पुढील वर्षीचा मार्च महिना उजाडणार आहे अशी, माहिती पीआयटीसीएमआरएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी दिली.
ही सेवा १५ जुलैपासून सुरू करण्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नियोजन आहे. उद्घाटनाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाच्या प्रगतीची माहिती अनिल कुमार सैनी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणेरी मेट्रो पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास मुदतीपेक्षा एक वर्षांहून अधिक काळ लागल्याने एकूण खर्चात २० टक्य्यांनी वाढ झाली आहे. हा खर्चाचा बोजा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल (पीआयटीसीएमआरएल) कंपनी उचलणार आहे, असे सैनी म्हणाले.
या मेट्रोलाइनच्या संपूर्ण २३ किलोमीटर मार्गाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मान ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १२ स्थानके जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे.
पुढील टप्प्यात हा मार्ग जिल्हा न्यायालयापर्यंत वाढवून महामेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार आहे. ताशी ८५ किलोमीटर वेगासाठी सीएमआरएस आणि रेल्वे मंत्रालयाची मंजुरीही मिळाली आहे. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास सध्याच्या दीड तासाऐवजी ४५ मिनिटांत पूर्ण होणार असून, प्रवासाच्या वेळेत ५० टक्क्यांहून अधिक बचत होईल. या मार्गावरील सर्व स्थानकांवरील सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासीसंख्या २ ते २.५ लाखांवर जाईल, असा विश्वास सैनी यांनी व्यक्त केला.
महामेट्रोशी एकत्रीकरण
जिल्हा न्यायालय स्थानकावर पुणेरी मेट्रो ही महामेट्रोशी (पिंपरी-स्वारगेट आणि वणज-रामवाडी) जोडली जाणार आहे. दोन्ही मेट्रोमार्ग जोडणारा भव्य पादचारी पूल तयार झाला आहे. प्रवाशांना 'पुणे वन' या एकाच मोबाईल ॲपवरून किंवा एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट काढून दोन्ही मेट्रोत प्रवास करता येणार आहे.
ही मेट्रो सकाळी ६ ते रात्री १२.३० वाजेपर्यंत धावणार असून, मेट्रोची गाड्यांची वारंवारिता सुरुवातीला ६ ते ७ मिनिटे आणि पुढील कालावधीत ४ मिनिटांपर्यंत कमी केली जाणार आहे. हिंजवडीतील ७ आयटी कंपन्यांनी मेट्रो स्टेशन्स थेट त्यांच्या कार्यालयाशी जोडण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत, ज्यापैकी २ चे काम पूर्ण झाले आहे. कर्मचाऱ्यांना रस्त्यावर न उतरता थेट ऑफिसमध्ये प्रवेश मिळेल, असे सैनी यांनी सांगितले.
मार्चपर्यंत मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होणार
मेट्रोच्या एकूण २३ स्थानकांपैकी उर्वरित स्थानके डिसेंबरअखेरपर्यंत सुरू होतील. मात्र, शिमला ऑफिस (स्थानक २२) आणि रेंज हिल्स (स्थानक २०) या भागातील कामे अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने तसेच या रस्त्यावरील प्रचंड वाहतुकीमुळे पोलिसांकडून केवळ रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच कामाची परवानगी मिळत असल्याने, संपूर्ण २३ स्थानकांचा मार्ग पूर्णक्षमतेने सुरू होण्यासाठी मार्च २०२७ची वाट पाहावी लागणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
ही मेट्रो मार्गिका तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर केला आहे. या मेट्रोचे डब्बे संपूर्ण भारतीय बनावटीचे असून, आंध्र प्रदेशातील कारखान्यात त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या मेट्रोला तिच्या चाकातून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. मेट्रोस्थानकावर येण्यासाठी विविध वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच स्मार्ट तिकीट प्रणाली, सौरऊर्जा, ईव्ही चार्जिंग आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अशा विविध सुविधा या मेट्रोमार्गावरील स्थानकांवर देण्यात आल्या आहेत.