Lok Sabha Exit Poll 2024 | निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला

Lok Sabha Exit Poll 2024 | निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणूक निकालाला आता जेमतेम ४८ तासच राहिल्याने निकालाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विशेषत: नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतून कोण बाजी मारणार, याविषयीच्या चर्चा आता अधिक जोमाने सुरू झाल्या असून, त्यात 'एक्झिट पोल'ने भर घातल्याने राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही निवडणूक चर्चेत रंगल्याचे दिसत आहे. त्यामुळे उमेदवारांची धडधड मात्र वाढली आहे.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी दि. २० मे रोजी मतदान पार पडले. गत ५७ वर्षांतील मतदानाचा उच्चांक मोडीत काढत नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक निकालापूर्वीच नवा इतिहास घडविला आहे. १९६७ नंतर नाशिकमध्ये प्रथमच ६१ टक्के भरघोस मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत यंदा दीड टक्का अधिक मतदान झाले. वाढलेला मतटक्का कोणाला धक्का देणार, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. या निवडणुकीतून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे 'हॅट्ट्रिक' साधतात की, महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे 'जायंट किलर' ठरतात की, शांतिगिरी महाराज यांच्या रूपाने नाशिकमधून नवी परंपरा सुरू होते, याकडे केवळ नाशिककरच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रजनांचे लक्ष लागले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा कमालीची चुरशीची ठरली. शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरे गटासाठी जशी ही निवडणूक अस्तित्वाची आहे, तितकीच ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या प्रतिष्ठेचीही होती. सिन्नर विधानसभा मतदारासंघातून महाविकास आघाडीचे वाजे किती आघाडी घेतात, यावरच नाशिक लोकसभा मतदारसंघातील जय-पराजयाचे गणित ठरणार आहे. सिन्नरमधून वाजे यांना सर्वाधिक मते मिळतील, हे उघड आहे. अर्थात सिन्नरमधून वाजे जी मतांची आघाडी घेतील, तीच त्यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, कारण नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम मतदारसंघांमध्ये गोडसे यांना मिळू शकणारी मतांची आघाडी तोडण्यासाठी वाजेंना सिन्नर मतदारसंघ हा एकमेव तारक ठरेल, असे सध्या तरी चित्र आहे.

दिंडोरीच्या वाढीव मतदानाचा धसका

कांदा निर्यातबंदीमुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने निवडणुकीतील मतदान टक्कावाढीची परंपरा यंदाही कायम ठेवली. दिंडोरीत ६६.७५ टक्के मतदान झाले असून, २०१९ च्या तुलनेत १.१० टक्के अधिक मतदान नोंदविले गेले. निवडणूक घोषित झाल्यापासून दिंडोरीची निवडणूक कांद्याभोवती फिरते आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा रिंगणात उतरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले. त्यामूळे कांद्याच्या आगारात कोण बाजी मारणार व कांदा कोणाला रडविणार हे ४ जूनला निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र या दोन्ही मतदारसंघांमधील निकालाची उत्कंठा चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news