Lok Sabha Election 2024 | प्रचाराचा फ्रायडे ठरला ‘ब्लॉकबस्टर’, बड्या नेत्यांनी गाजविले मैदान

Lok Sabha Election 2024 | प्रचाराचा फ्रायडे ठरला ‘ब्लॉकबस्टर’, बड्या नेत्यांनी गाजविले मैदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १८) प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने, शुक्रवारी (दि. १७) महायुती व महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी नाशिकमध्ये येत मैदान गाजविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभा, बैठका घेत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीदेखील नाशिकमध्ये प्रचारसभा घेत प्रचाराचा धुराळा उडवून दिला.

दि.१३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर, राज्यातील सर्व बड्या नेत्यांनी नाशिककडे मोर्चा वळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते शरद पवार, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बड्या नेत्यांच्या सभा व रोड शो झाल्यामुळे, नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात शुक्रवारी अधिक भर पडली. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिवसभर बैठका, सभा घेत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीदेखील सभा घेत, मविआ उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. प्रचाराला अवघे काही तास उरले असल्याने, उमेदवार व त्यांच्या टीमकडून रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरू होते. शनिवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा शांत होणार असल्याने, उमेदवारांनी कमी कालावधीत अधिकाधिक नागरिकांना कसे भेटता येईल, यादृष्टीने नियोजन करत प्रचार केल्यामुळे, शुक्रवार खऱ्या अर्थाने प्रचाराचा वार ठरला.

दुसरीकडे अपक्षांनीदेखील जोरदार प्रचार केला. घरोघरी पत्रके वाटण्याबरोबरच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. ज्या भागात पाठबळ मिळतेय, अशा भागांत अपक्षांनी चौकसभा घेतल्या. काहींनी प्रचार रॅली काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर लावल्याने, फ्रायडे प्रचाराचा ब्लॉकबस्टर ठरला.

योगींची आज तोफ धडाडणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. १८) मालेगाव येथे होत असल्याने, नाशिक जिल्ह्याचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे 'वंचित'चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हेदेखील नाशिकमध्ये दोन आणि जिल्ह्यात एक सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचाही रोड शो सातपूर परिसरात होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही बड्या नेत्यांच्या सभा असल्याने, नाशिकचा आखाड्यात रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.

हायटेक प्रचारावर जोर

यंदाच्या निवडणुकीत हायटेक प्रचाराचादेखील वापर मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा उडवून दिला जात असतानाच, रेकॉर्डेड कॉल्सवरून थेट मतदारांना मतांसाठी गळ घातली जात आहे. त्याचबरोबर मतदारांच्या मोबाइलवर संदेश पाठवून मतदानासाठी आवाहन केले जात आहे. हायटेक प्रचाराव्यतिरिक्त संपूर्ण शहरभर मोठमोठे होर्डिंग्ज बघावयास मिळत आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news