

देवळाली कॅम्प : भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मधील डिसेंबर 2025 महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करत विविध उत्पन्न स्रोतांमधून एकूण 152.95 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, कार्यक्षम व्यवस्थापन आणि संघभावनेमुळे ही लक्षणीय वाढ साध्य झाली आहे.
डिसेंबर 2025 मध्ये राबविण्यात आलेल्या सखोल व नियोजित तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान, विनातिकीट, अयोग्य अथवा अवैध प्रवास अधिकारासह प्रवास करणाऱ्या 60 हजार 670 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेतून 4.58 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही रक्कम 4.05 कोटी इतकी होती, म्हणजेच सुमारे 13 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे विभाग प्रवाशांना अधिक उत्तम, सुरक्षित व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नवकल्पनांचा अवलंब, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्वच्छता अभियान, प्रवासी सुविधांचा विस्तार तसेच तांत्रिक सुधारणा यांसारख्या विविध क्षेत्रांत विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत.
विनाविलंब व अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य व वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच, सर्व प्रवाशांनी आपल्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी रेलवन मोबाइल ॲप डाउनलोड करून तिकीट खरेदी व प्रवासाशी संबंधित सेवा डिजिटल माध्यमातून वापराव्यात, असे रेल्वे प्रशासनाचे आवाहन आहे. यामुळे वेळेची बचत होईल, गर्दी टाळता येईल आणि प्रवास अधिक सुरक्षित व आनंददायी बनेल.
डिसेंबर 2025 मधील महसूल तपशील (रक्कम कोटींमध्ये)
प्रवासी उत्पन्न : 79.76 कोटी
डिसेंबर 2024 च्या तुलनेत सुमारे 23 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर सेवा पुरविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेला हा थेट प्रतिसाद आहे.
इतर कोचिंग उत्पन्न : 6.44 कोटी
आरक्षण शुल्क, पार्सल सेवा तसेच कोचिंगशी संबंधित विविध उपक्रमांतून प्राप्त झालेले उत्पन्न.
मालवाहतूक उत्पन्न : 64.51 कोटी
पेट्रोलियम पदार्थ, कांदा, डीओसी, ऑटोमोबाइल एनएमजी, अन्नधान्य आणि सीमेंट यांसारख्या विविध मालवाहतुकीतून मिळालेला महसूल.
विविध उत्पन्न : 2.24 कोटी
इतर शुल्क, सेवा व विविध स्रोतांमधून प्राप्त झालेले उत्पन्न.