

लासलगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेली थंडी व सतत ढगाळ वातावरणचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
थंडीबरोबरच ढगाळ हवामानामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डावणी, करपा, भुरी यासारख्या रोगांचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांना फवारण्या व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागत आहेत. यासाठी महागडी औषधे, कीटकनाशके तसेच मजुरीचा खर्च वाढत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
मान्सूननंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षबागेचे नुकसान झाले. त्यात बाजारातील चढउतार, वाढलेला उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांच्या आर्थिक अडचणीत त्यामुळे भर पडत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून द्राक्षबागांची लागवड केली. सध्याच्या हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेत तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रत्येक द्राक्ष उत्पादकांना एकरी किमान 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटना व तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांकडून करण्यात येत आहे. जर वेळीच मदत मिळाली नाही तर अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
यंदा अति पावसामुळे 70 टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाले. ढगाळ वातावरणाने फुगवणीच्या स्टेजमधील द्राक्षांची फुगवण थांबली आहे. रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने औषध फवारणींचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. केंद्र व राज्य सरकारने उत्पादकांना एकरी 50 हजार ते 1 लाख रुपयांची मदत करावी.
अनिल शिंदे, द्राक्ष उत्पादक, खडक माळेगाव