

नाशिकरोड : बिबट्यांमुळे घर व परिसरात राहणे असुरक्षित झाल्यामुळे जयभवानी रोडवासीयांनी मोर्चा व निदर्शने करीत थेट रस्त्यावरच आपले बस्तान बसवून वनविभागाचा निषेध केला. वेळीच पोलिसांनी आंदोलकांना आवर घातल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळली.
जय भवानी रोड परिसरात सातत्याने बिबट्यांचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोणकर मळा, पाटोळे मळा, मनोहर गार्डन या भागात दिवसा आणि रात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन वन विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात शनिवारी (दि.४) जनआक्रोश व्यक्त केला. मोर्चाची सुरुवात नेहरू नगर येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरापासून झाली. नागरिकांनी बिबट्या घरात, नागरिक दारात अशा घोषणांद्वारे संताप व्यक्त करत महिलांनी रस्त्यावरच स्वयंपाक करून वनविभागाचा निषेध केला.
सदर मोर्चा के.जे. मेहता हायस्कूल रोड, डावखरवाडी मार्गे जयभवानी रोडवरील श्री तुळजाभवानी माता मंदिरापर्यंत पोहोचला. येथे नागरिकांनी सुमारे अर्धा ते पाऊण तास रस्ता रोको आंदोलन केले. परिणामी, वाहतूक काही काळ ठप्प राहिली आणि वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी वडनेर दुमाला आणि पिंपळगाव खांब परिसरात नरभक्षक बिबट्याने दोन लहान मुलांचा बळी घेतला होता. त्या घटनेनंतर नागरिकांनी वन विभागाविरोधात ठिय्या आंदोलन केले आणि परिसरात १८ पिंजरे व १५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्याचा परिणाम म्हणून पाच दिवसांपूर्वी एका बिबट्याला वडनेर गेट परिसरात जेरबंद करण्यात आले. जय भवानी रोड परिसरात अशीच परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा जनआक्रोश व्यक्त केला आणि बिऱ्हाड मोर्चा काढला.
यावेळी योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार छत्रिय, प्रीतम घोरपडे, बाळासाहेब डावखर, शिवाजी लवटे, सचिन लवटे, अक्षय जाचक, माधुरी पाटील, प्रतीक जाचक, निलेश देशमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट तसेच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकले व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी जय भवानी रोड परिसरात अधिक पिंजरे लावावे, सीसीटीव्ही बसवावे आणि बिबट्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नेमावे अशी मागणी केली आहे.