

देवळाली कॅम्प (नाशिक) : देवळाली कॅम्प, भगूरसह लगतच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळे ऐन सणासुदीत रहिवासी भयभीत झाले आहेत. कमीत कमी 10 ते 12 पिंजरे या परिसरात लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
मागील वर्षभरापासून दारणाकाठच्या पट्ट्यामध्ये बिबट्यांचे अस्तित्व नियमित दिसून येत आहे. सध्या नाशिक तालुक्यात बिबट्यांचा सुळसुळाट वाढला असून, वडनेर दुमाला, दाढेगाव, पिंपळगाव खांब या परिसरात बिबटे नरभक्षक होताना दिसत आहेत. बेलतगव्हाणला तर चार बिबटे एकाच वेळी आढळल्याने तेथील नागरिक दिवसासुद्धा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून संसरी, बेलतगव्हाण, नानेगाव, शेवगे दारणा, सह्याद्रीनगर, शिंगवे बहुला, बान्स स्कूल, खंडोबा टेकडीसह भगूर, लहवित, वंजारवाडी, दोनवाडे, लोहशिंगवे या भागांमध्ये दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून संसरीच्या मुख्य रस्त्यावर बिबट्या रात्री १२ नंतर अगदी पोलिसांप्रमाणे गस्त घालताना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने कमीतकमी 10 ते 12 पिंजरे या भागात उभारावेत, अशी मागणी संसरीचे सरपंच विनोद गोडसे, राजेश गोडसे, शेखर गोडसे, नानेगावाचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, देवळाली कॅम्पचे रिपाइं शहर नेते सुरेश निकम, भगूरचे माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख, शिंगवे बहुलातील प्रमोद मोजाड, सह्याद्रीनगर भाजपचे शहर उपाध्यक्ष सतीश कांडेकर आदींसह नागरिकांनी केली आहे.
नासाकावर मादीसह बछडे
पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील नर्सरीमध्ये बिबट्याची मादी व दोन पिलांचा अधिवास आहे. नर्सरीमधून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने मुलांसमोर रस्ता ओलांडल्याने शिक्षक व नागरिक भयभीत झाले. याबाबत कारखाना प्रशासनाने तातडीने वनविभागाला माहिती देत पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली.
उदंड झाले बिबटे - दारणाकाठच्या ग्रामीण भागात फिरणारे बिबटे आता थेट सोसायटी परिसरात दिसू लागले आहेत. आनंद रोडवर गर्दीच्या ठिकाणी बिबट्यांचे दिसणे, हे सर्वांसाठी धोकादायक आहे.
सुरेश निकम, रिपाइं नेते