

नांदेड : पुढारी वृत्तसेवा
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाची योजना आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांना १,५०० रुपये दिले जातात. परंतु लाडकी बहीण योजनेमुळे 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी राज्य सरकारची अवस्था झाल्याची कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
या योजनेमुळे सद्यःस्थितीत सरकारची कसरत सुरू असल्याची कबुली झिरवाळ यांनी दिली. प्रथमच एखाद्या मंत्र्याने वस्तुस्थिती मान्य केल्याने या वक्तव्याला अतिशय महत्त्व आले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे ठेकेदारांची तब्बल ५० हजार कोटींची देयके अडकल्याने राज्यात दररोज ठेकेदारांची विविध गावांत आंदोलने सुरू झाली आहेत.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी वाळकेवाडी येथे बोलताना लाडकी बहीण योजना आणि संभाव्य दुष्काळाची चाहूल यामुळे सरकारची मोठी आर्थिक कसरत सुरू असल्याची कबुली झिरवाळ यांनी दिली.
१९७२ मध्ये अन्नाचा दुष्काळ होता. मात्र, आज अन्नाची टंचाई नाही. परंतु, पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे किंवा विमानाने पाणी पोहोचवण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्यास मोठा निधी लागेल. त्यामुळे यंदा तसेच पुढच्या वर्षीही काहीशी आर्थिक चणचण भासू शकते, असे मत झिरवाळ यांनी मांडले. या संकटकाळात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाळकेवाडी येथे बोलताना अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडे मागे-पुढे होत असल्याचे विधान झिरवाळ यांनी केले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजितदादा पवार असताना घड्याळ एक मिनिट मागे-पुढे होत नव्हते; आता घड्याळ थोडे मागे-पुढे होत असले, तरी घड्याळ व्यवस्थित असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामागे नेमका राजकीय अर्थ काय असावा, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे.