

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेतीची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या विशेष आदेशानुसार नांदेड पोलिसांनी धडक मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी विष्णुपुरी आणि भगवान बाबा चौक परिसरात दोन स्वतंत्र यशस्वी कारवाया केल्या. या कारवाईत पोलिसांनी दोन हायवा ट्रकसह १० ब्रास अवैध रेती असा एकूण ८० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१६ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक विष्णुपुरी परिसरात गस्त घालीत असताना, वाडीपाटीकडून एका हायवा ट्रकमधून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. पथकाने सहयोग कॅम्पस रोडवर सापळा रचून टाटा हायवा (क्र. MH-26-BD-4100) अडवला. चालकाकडे रॉयल्टीची कागदपत्रे मागितली असता कोणतीही परवानगी किंवा पावती नसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास रेती असा एकूण ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक गणेश दशरथ गायकवाड (रा. बाभुळगाव, ता. व जि. नांदेड) याच्याविरुद्ध भा.न.सं. कलम ३०३(२) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी भगवान बाबा चौक परिसरातून आणखी एक हायवा ट्रक (क्र. MH-26-BE-4100) अवैध रेती घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून तो वाहन ताब्यात घेतला. या कारवाईतही ४० लाख रुपयांचा ट्रक व २५ हजार रुपयांची ५ ब्रास रेती असा ४० लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यात चालक गणेश दशरथ गायकवाड आणि वाहन मालक मधुकर अरुण दिघे (रा. कारेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सपोनि कपिल पाटील, पोउपनि आनंद व गुन्हे शोध पथकातील अंमलदार विष्णु खिल्लारे, भिसे, पवार, विष्णू कल्याणकर, हणमंत तेंलग, समीर अहेमद व बालाजी यादगीरवाड यांच्या पथकाने पार पाडली. अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.