

Lack of development due to non-elections
नाशिक : पुढारी वृत्तसेवा गत तीन - चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने एक पिढी नेतृत्वापासून वंचित राहिली आहे. निवडणुकांअभावी सध्या ग्रामविकास आणि नगरविकास मंत्र्यांचेच राज्य सुरू असून, सगळी व्यवस्था एका व्यक्तीच्या हातात केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजा करतो तसा कारभार सुरू आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने विकासाची मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या प्रशिक्षण शिबिरात पाटील पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी यावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, लाडकी बहिणीचा हप्ता वाढविणे आदी आश्वासने दिली होती. मात्र, ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. हा असंतोष वाढत चाललेला आहे.
लोकांचे मत सतत परिवर्तित होत असते. त्यासाठी लोकांमध्ये उतरा, आपले मुद्दे पटवून द्या, असे पाटील यांनी सांगितले. मतचोरी हा लोकशाहीसाठी मोठा धोका असून, पक्ष फोडून आता मते चोरली जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुकीतील अनिश्चितता, लोकशाहीवरील धोके आणि भाजप सरकारवर तिखट शब्दांत टीका केली.
आगामी निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना बूथ कमिट्या मजबूत करण्याचे, तरुणांना प्राधान्य देण्याचे आणि स्वच्छ, नवीन चेहरे पुढे आणण्याचे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकदिवसीय शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनुपस्थित होते. पाटील अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या शिबिराला ते उशिरा दाखल झाले. शिबिरात उशिरा येण्यासाठी भारतीय रेल्वे जबाबदार असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.