Khandoji Maharaj Yatrotsav : खंडोजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली पिंपळनेर नगरी, सजीव देखावे ठरले लक्षवेधी

कलियुग सांस्कृतिक कला मंडळ
कलियुग सांस्कृतिक कला मंडळ
Published on
Updated on

पिंपळनेर: (ता.साक्री)

येथील श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या 195 व्या नामसप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. विठ्ठल मंदिरात पहाटे महाकाकड आरती झाली. तर रात्री 11 वाजता विठ्ठल मंदिरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रात्रीला पूर्वीपासून पालखीची रात्र असे संबोधले जाते. खंडोजी महाराजांच्या पादुका, 300 वर्षांपूर्वीची हस्तलिखित गीता व श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती असणाऱ्या पालखी सोहळ्यात विविध ठिकाणांहून आलेल्या दिंड्या सहभागी झाल्या. मधुर संगीत व कीर्तनाच्या तालावर भक्त तल्लीन झाले होते. पालखी मार्गात विविध मंडळांकडून रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली. सामाजिक व राजकीय पक्षाच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. (Khandoji Maharaj Yatrotsav)

 संबधित बातम्या :

एकोप्याचा संदेश

195 वर्षाचा जातीय सलोखा आजही कायम ठेवत मध्यरात्री शहरातील जामा मशिदी समोर जहागिरदार कुटुंब व मुस्लीम बांधवांच्या वतीने पालखीचे व योगेश्वर महाराज देशपांडे यांना मानाची वस्त्रे देऊन भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची, राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सजीव देखावे

त्याचप्रमाणे विविध मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने पायदळी सोंगे व पौराणिक दृश्यांवर आधारीत सजीव चित्ररथ (वहन) सादर करण्यात आले. 76 वर्षाची परंपरा असलेले नाना चौकातील कलियुग सांस्कृतिक कला मंडळाने यावर्षी 'कलकी अवतार', सुभाष चौकातील युवा संघर्ष सांस्कृतिक कला मंडळाने 'रत्नासुराचा वध', भोईराज मंडळाने 'मोहिनी अवतार' हे वहन काढण्यात आले.

नामसप्ताह महोत्सवात देखावे (वहन) सादर करणाऱ्या मंडळांना कुस्ती समितीच्या वतीने रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले.

व्यावसायिक उत्साह

यात्रेत विविध पाळणे, खेळणे, व्यावसायिक दाखल झाल्यामुळे संपूर्ण शहरातील बाजारपेठा गजबजलेल्या असून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने विभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकासह राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news