

कळवण : पुढारी वृत्तसेवा
येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या प्रसूतीसाठी मातेचा प्रसूतीनंतर काही तासांत मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात ठिय्या देत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी कारवाईचे आश्वासन शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला.
दिल्यानंतर नातलगांनी तताणे (ता. बागलाण) येथील संगीता पवार (३१) यांना प्रसूतीसाठी गुरुवारी (दि. १६) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी सिझर प्रसूती करण्यात आली. नवजात बालक सुखरूप असताना शुक्रवारी (दि. १७) सकाळी ९ च्या सुमारास मातेला अस्वस्थ वाटत असल्यामुळे संबंधित डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठवावे लागेल असे सांगितले.
मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मातेचा मृत्यू झाल्याने दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत संतप्त नातलगांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या दिला होता.
पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी नातलगांच्या भावना समजून घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातलगांनी केली. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
रुग्णकल्याण समिती शोभेचे बाहुले
कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत मातेचा मृत्यू होऊन ५ तास झाल्यानंतरही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नव्हते. बहुतांश वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासी राहण्याचा भत्ता घेतात. मात्र, रुग्णालयात वेळेवर उपस्थित राहात नाहीत. त्याचा त्रास रुग्ण व नातेवाइकांना भोगावा लागतो. अधीक्षकच उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप नातेवाइकांनी केला. नियंत्रण ठेवणारी रुग्णालय कल्याण समितीही बघ्याची भूमिका घेणारी ठरत आहे.
औषधे, साहित्य खासगी दुकानांतून
शासकीय रुग्णालयात गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णाच्या शस्त्रक्रिया करतेवेळी लागणारी औषधे, इतर साहित्य नातेवाइकांना सांगून खासगी दुकानातून मागवले जातात. मग शासनाने शासकीय रुग्णालय कशासाठी उभारली ? या ठिकाणाहून सर्रास खासगी रुग्णालयांत रुग्णांना पाठवण्यात येते. काही डॉक्टर खासगी रुग्णालयात इतर पेशंटला तपासण्यासाठी जात असल्याचा आरोप होत आहे.