

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाढणारी वाहतूक कोंडी आणि नियोजित जागा सोडून गर्दीच्या ठिकाणी भरणारे भाजीबाजार यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नाशिक महापालिकेने सिंहस्थापूर्वी हॉकर्स झोनचे फेरनियोजन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दिली.
फेरीवाल्यांचे पुनर्वसन करीत त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देताना शहराचे बकालपण दूर करण्यासाठी केंद्राने २००९ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू केले होते. त्यानुसार २०१२ मध्ये नाशिकमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करीत फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.
त्यात मुक्त, प्रतिबंधित आणि ना फेरीवाला अशा तीन प्रकारांत ३१० क्षेत्रांची विभागणी करण्यात आली होती. त्यात १६६ मुक्त, ६१ प्रतिबंधित आणि ८३ ना फेरीवाला क्षेत्रांचा समावेश होता. त्यावेळी १० हजारांहून अधिक फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, इतकी वर्षे उलटूनही फेरीवाल्यांचे पुनर्वसन झालेले नाही.
यासाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, त्यासाठी आवश्यक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊनही या समिती सदस्यांच्या नावांचे शासन राजपत्र प्रसिद्ध झालेले नाही. शहरात गेल्या काही वर्षांत भाजीबाजारांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
नाशिकरोड, आकाशवाणी, हिरावाडी, विडी कामगारनगर यांसारख्या भागांत रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन भाजीबाजार उभारण्यापूर्वी हॉकर्स झोनचे फेरनियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दिली.